मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परभणी शहरातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक होते. शहरातील रामकृष्णनगर, कल्याणनगर, शिवरामनगर या तीन वसाहतींमध्ये रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने या वसाहती प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचे आदेश तहसीलदार संजय बिरादार यांनी १७ मार्च रोजी काढले. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत तीनही वसाहतीमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाले आहे. या वसाहतीतील नागरिकांना घराबाहेर पडण्यास किंवा बाहेरील नागरिकांना वसाहतीत प्रवेश करण्यास निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर 'लोकमत' ने गुरुवारी तीनही वसाहतींना भेट दिली. तेव्हा प्रतिबंधित क्षेत्राच्या संदर्भाने कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. एकाकी वसाहतीत बॅरिकेटिंग करण्यात आले नाही. तसेच प्रशासकीय यंत्रणा वसाहतीत फिरूनी उपाययोजना करीत नसल्याचे दिसले. विशेष म्हणजे, तीनही वसाहतींमध्ये स्वच्छता कर्मचारी मात्र स्वच्छतेची कामे करीत असल्याचेही यावेळी पहावयास मिळाले.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे केवळ आदेश काढून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर प्रशासनाचा भर आहे. या आदेशाची अंमलबजावणी मात्र होत नसल्याने कोरोना वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
रामकृष्ण नगरात नागरिकांच्या तपासण्या
रामकृष्णनगर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यानंतर महानगरपालिकेने नागरिकांची तपासणी करण्यासाठी केंद्र सुरू केले आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या केंद्रावर तपासण्या सुरू होत्या. आयुक्त देवीदास पवार यांनी भेट देऊन परिसराची तसेच तपासणी केंद्रावरील कामकाजाची पाहणी केली. याप्रसंगी भाजपच्या गटनेत्या मंगलताई मुदगलकर यांचीही उपस्थिती होती.
बॅरिकेडिंग, तपासणीला खो
प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेडिंग केले जाते. या तीनही वसाहतीमध्ये कुठेही बॅरिकेडिंग केले नव्हते. तसेच वसाहतीतील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. या तपासणी करताना आरोग्य कर्मचारी आढळले नाहीत. सर्वेक्षण ही होत नसल्याची बाब दिसून आली. रामकृष्णनगर येथील कोरोना तपासणी केंद्र वगळता इतर दोन वसाहतीत तपासणीसाठीही व्यवस्था नसल्याचे पहावयास मिळाले.