परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रशासन आणि इतर टेस्टिंग फेस्टिंगचे काम हे फार बोगस आहे. या विषयावर मी बिलकुल समाधानी नाही, असा संताप विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बुधवारी व्यक्त केला. या संदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये बुधवारी व्हायरल झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.
परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हा शल्यचित्सिक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांचे कामकाज समाधानकारक नसल्याची बाब अनेक वेळा समोर येऊनही त्यांना पाठीशी घालण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून झाल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीची एक ऑडिओ क्लिप बुधवारी विविध समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केंद्रेकर यांनी परभणी जिल्ह्याच्या कामकाजासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्रेकर म्हणतात, परभणी, हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आहे की, या जिल्ह्यात मोठमोठी लग्ने होत आहेत. तेथे मंजूर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होत आहे. तरीही काहीही कारवाई केली जात नाही. याबाबतचे मेसेज मला येत आहेत. सर्वजण झोपा काढत आहेत. असे चालणार नाही. सर्व मंगल कार्यालयांना सक्त ताकीद द्या, त्यांना नोटिसा द्या, मंगल कार्यालयांवर धाडी टाका, तेथे नागरिक मास्कचा वापर करतात की नाही पहा. मंजूर क्षमतेपेक्षा अधिक नागरिक असतील तर पहिल्यांदा दंडात्मक कारवाई करा, दुसऱ्यांदा आढळल्यास गुन्हे दाखल करा, कोचिंग क्लासेसवरही धाडी टाका. तेथेही मास्कचा वापर, सॅनिटायझर, आदी बाबींचे पालन होते की नाही ते पहा, त्यांनाही नोटिसा द्या, दुसऱ्यांदा सापडल्यास गुन्हे दाखल करा, जास्त गर्दीच्या ठिकाणी तातडीने कारवाई करा, कोरेानाचा नवीन विषाणू आला आहे. खासगी डॉक्टरांकडे सर्दी, खोकला, आदी कोरोनाच्या अनुषंगाने लक्षणे असलेले रुग्ण येत आहेत. परंतु, काही डॉक्टर्स त्यांना कोरोना चाचण्या करण्याचे सांगत नाहीत. हे चुकीचे आहे. त्यांना तशा नोटिसा द्या. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांनी एकत्र येऊन ही मोहीम राबवावी. परभणी जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन आणि इतर टेस्टिंग फेस्टिंग फार बोगस आहे. या विषयावर आपण बिलकुल समाधानी नाही. याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यात परभणी मागे
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे परभणी जिल्ह्याचे प्रमाण ९ आहे. प्रत्यक्षात ते २० पाहिजे. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही, दहा वेळेस त्यांना सांगूनही तीच परिस्थिती आहे. कृपया, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याचे प्रमाण वाढवा, अशी कळकळीची विनंतीही केंद्रेकर यांनी या क्लिपमध्ये केली आहे.