परभणी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार बेशिस्तपणे चालला असून, तीन पक्षांची मर्जीत राखत हे सरकार टिकविण्याची कसरत केली जात आहे, असा आरोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांनी येथे केला. ( The administration of the state has run erratically : Bhagwat Karad )
भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री कराड येथे आले होते. गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यात्रेचा हेतू स्पष्ट केला. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर अध्यक्ष आनंद भरोसे आदींची उपस्थिती होती.
डॉ. कराड म्हणाले, राज्य शासनाने पीक विम्याचे सर्वेक्षण करण्यासाठी चुकीची एजन्सी नेमल्याने शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे यापुढील काळात डिजिटल सर्वेक्षण करण्याची पद्धत लागू करता येईल का? या संदर्भाने विचार सुरू आहे. परभणीतील मेडिकल कॉलेजसाठी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्या वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी कराड यांनी पालकमंत्री नवाब मलिक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांच्यावर टीका केली. पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले असले तरी मोदींवर टीका करण्याइतकी त्यांची उंची नसल्याचे डॉ.कराड म्हणाले.
परभणीचे पालकत्व घेऊन काम करेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील बंद असलेले सीसीआयचे केंद्र, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा वाढविणे, मुद्रा लोनचे वाटप आदी प्रश्न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.