परभणी : पुणे, मुंबई आदी महानगरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या शहरांमध्ये जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला जाण्यास व येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे वर्षभरात दुसऱ्यांदा या ट्रॅव्हल्सचालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे विविध व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात ट्रॅव्हल्सचालकांचाही समावेश आहे. जवळपास ४ ते ५ महिन्यांच्या बंदीनंतर ही खासगी प्रवासी वाहतूक सुरू झाली. आता पुन्हा पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आदी भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण अधिक आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भात आणि पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसची ये-जा करण्यास जिल्ह्यात १७ मार्चपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांना पुन्हा एकदा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे एसटी बस मात्र या शहरांमध्ये जात आहेत. त्यामुळे एसटी बसमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही आणि खासगी बसमुळे संसर्ग होतो, असा प्रशासनाचा अंदाज आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
गाडी रूळावर येत होती, पण...
जवळपास ४ ते ५ महिने या खासगी ट्रॅव्हल्स बंद होत्या. अनलॉकनंतर त्या हळूहळू सुरू झाल्या. प्रारंभी कमी क्षमतेने त्या चालविल्या गेल्या. आता कुठे काही दिवसांपासून पूर्ण क्षमतेने या बसेस चालत होत्या. त्यामुळे त्यांची आर्थिक गाडी रुळावर येत असताना, प्रशासनाने बंदीचा निर्णय घेतला.
एसटी बसेस पुणे, मुंबईसाठी चालिवल्या जातात आणि खासगी बसेस बंद केल्या जातात. त्यामुळे प्रशासनाला नेमके काय म्हणायचे आहे, स्पष्ट होत नाही. प्रशासनाचा हा निर्णय ट्रॅव्हल्सचालकांवर अन्याय करणारा आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा.
- संभानाथ काळे, व्यावसायिक
बंदच्या काळात व्यवसाय मिळणार नसल्याने शासनाचे कर, विम्याचे हप्ते आणि बँकांच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे उपलब्ध होणार नाहीत. तेव्हा बंद काळातील कर, विमा हप्ते भरण्यास प्रशासनाने मुदतवाढ द्यावी. ज्यामुळे व्यावसायिकांची गैरसोय होणार नाही.
- जिल्हा खासगी बस संघटना
पुण्याला जाणाऱ्या १५ बसेस बंद
परभणी येथून पुण्याला दररोज १५ खासगी बसेस जात होत्या. त्या आता बंद झाल्या आहेत. याशिवाय मुंबईला ४, नागपूर येथे ६, नाशिक येथे २ आणि सुरत येथे २ बस जात होत्या. त्याही बंद झाल्या आहेत.