परभणी : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी २४ रेशन दुकानांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यात ई- पॉस मशीनच्या साह्याने रेशनच्या धान्याचे वितरण केले जाते. त्यामुळे मशीनद्वारेच धान्य वितरण करणे बंधनकारक आहे. मात्र काही रेशन दुकानदार ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करताना कसूर करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. वारंवार सूचना देऊनही सुधारणा होत नसल्याचे पुरवठा विभागाच्या निदर्शनास आले होते.
जिल्हा पुरवठा विभागामार्फत आयोजित बैठकांना उपस्थित न राहणे, ई- पॉस मशीन वेळेवर लाईव्ह न करणे, ई-पॉस मशीनद्वारे १०० पेक्षा अधिक ट्रॅन्झेक्शन्स न करणे, धान्य उशिरा उचलणे आदी कारणांमुळे जिल्हा पुरवठा विभागाने ही कारवाई केली आहे. जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईनुसार पाथरी तालुक्यातील पाच स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सेलू तालुक्यातील एक परवाना निलंबित करण्यात आला. तसेच जिंतूर तालुक्यातील एक, पाथरी तालुक्यातील ७ आणि पालम तालुक्यातील १० रेशन दुकानदारांच्या अनामत रक्कमा जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे. स्वस्त धान्य वितरणात अनियमितता केल्यास यापुढेही अशा स्वरुपाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुरवठा विभागातून देण्यात आली.