मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेंतर्गत २०१९-२०२० या वर्षासाठी परभणी महानगरपालिकेला एकूण ८ कोटी रुपयांचा निधी मार्च अखेरीस मिळाला होता. या निधीतून करावयाच्या कामाचे आराखडे तयार करून त्यास विभागीय आयुक्तांची मान्यता घेण्याच्या प्रक्रियेस बराच वेळ लागला. अशातच पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता विभागात लागू झाली. त्यामुळे या कामाच्या प्रक्रियेस विलंब झाला. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या प्रलंबित प्रक्रियेस वेग आला आहे. त्यानुसार महानगरपालिकेने तयार केलेला आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना सादर करण्यात आला. त्यानुसार केंद्रेकर यांनी १५ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे घेतलेल्या बैठकीत या आराखड्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली, त्यामुळे या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे, आता या कामाच्या निविदा महानगरपालिकेकडून काढल्या जातील. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
एकूण २१ कामांचा आराखड्यात समावेश
महानगरपालिकेने ८ कोटी रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या कामाच्या आराखड्यात एकूण २१ कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही कामे दोन टप्प्यात करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांच्या निधीतून प्रभाग क्र. १० अंतर्गत जिंतूर रोड रायगड कॉर्नर पासून ते दर्गापर्यंत डांबरीकरण व दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम यासाठी तब्बल ४ कोटी ११ लाख ६४ हजार ९०० रुपये देण्यात आले आहेत. तसेच प्रभाग क्र. ४ मध्ये आशीर्वादनगर येथे दुर्गादेवी मंदिराजवळील कॅनलवर पूल बांधण्यासाठी ५४ लाख ८१ हजार ८३ रुपये तर प्रभाग क्र. १० अंतर्गत उमरीकरनगर येथे सरस्वती भवन विद्यालय ते बंसीधर रेंगे यांच्या घरापर्यंत डांबरीकरण रस्ता व दोन्ही बाजूने सीसी नाली बांधकाम करणे, रामनगर येथे शहराणे यांच्या घरापासून ते पोले यांच्या घरापर्यंत डांबरीकरण करणे या कामासाठी ३८ लाख ५२ हजार १०० रुपये देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३ कोटी रुपयांच्या निधीतून १८ कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रभाग क्र. १, ७, ९, १२ या भागात सीसी नाली बांधकाम, रस्ता मजबुतीकरण, चौक सुशोभिकरण, नालीवर स्लॅब टाकणे आदी कामे करण्यात येणार आहेत.