सोनपेठ (परभणी ) : तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आज प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उभारी कार्यक्रमा अंतर्गत प्रत्यक्ष घरी जाऊन भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
तालुक्यातील 2012 पासुन आत्महत्या केलेल्या 20 शेतक-यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजना मिळाव्यात त्यांचे आर्थिक मागासलेपण जाऊन त्यांना आर्थिक स्थैर्य कशा प्रकारे देता येईल यासाठी महसुल विभागाकडुन उभारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याबाबत महिला आयोग, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद व इतर अशासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दोन दिवशीय कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील महिलांशी संवाद साधला आसता असे लक्षात आले की, या कुटुंबीयांच्या विविध अडचणी असुन यात प्रशासन मोठी मदत करू शकते.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी व नियुक्त केलेला अधिकारी कर्मचारी यांनी तहसिलदारांनी नियोजन केल्याप्रमाणे तालुक्यातील चौदा गावातील विस कुटुंबाची प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेऊन त्यांच्या मागण्या व गरजा शासनदरबारी व सेवाभावी संस्थेकडुन कशा मान्य करता येतील याबाबतचा आराखडा तयार केला.या दौ-याचे नियोजन तहसिलदार जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.यात नरवाडी, नरवाडी तांडा, खडका, उंदरवाडी, शिरोरी, पारधवाडी, वाणीसंगम, खपाटपिंप्री, गवळीपिंप्री, आवलगाव, उखळी बु., सोनपेठ, देविनगर, वंदन, कोठाळा या गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना अधिकारी व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांनी भेटी दिल्या. यात तहसिलदार जिवराज डापकर, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, गणेश पाटील, डी.बी.नागरगोजे, डि.आर.चंदेल, मिलिंद बिडबाग, एस.ए.घोडके, देविकांत देशमुख, एस.पी धारासुरकर, एस.ए.कराड, विठ्ठल जायभाये आदी अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता.
घरकुलाची केली मागणी भेटी दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी नविन व्यवसायासाठी कर्जाची व घरकुलाची मागणी केली आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबाना वीज व गॅस जोडणी सुविधाचा लाभ मिळालेला आहे.- जिवराज डापकर, तहसीलदार सोनपेठ