झरी (जि.परभणी) : परभणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाडी दमई येथे प्रजासत्ताक दिन, माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत 'कलाविष्कार' स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. यात चिमुकल्यांच्या कलाविष्काराला गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. गावकऱ्यांनी चिमुकल्यांना ३०,५३० रुपयांची रोख बक्षिसे दिली. या पैशांचा सदुपयोग करीत शाळा प्रांगणात बोअर घेत पाणीसमस्या मार्गी लावली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिक्षण आणि संस्कारांबरोबरच मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी नेटके आयोजन करून वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर, स्वच्छताविषयी, सामाजिक एकात्मता वाढीस लागणारे, धार्मिक गीते, शिक्षणातील आधुनिक बदल सांगणारे, भीमगीत, आदी एका चढ एक गीतांवर नृत्याविष्कार सादर केला. विद्यार्थ्यांच्या अप्रतिम कलाविष्काराला प्रतिसाद म्हणून गावकऱ्यांनी बक्षीसरूपी रोख रक्कम दिली. यातून शाळा परिसरात १५० फूट कूपनलिका खोदण्यात आली. या कूपनलिकेला ५० फुटांवर पाणी लागले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला होता. यावेळी सरपंच शिवप्रसाद बिडकर यांनी विद्युत मोटरची सोय करून विद्यार्थ्यांसाठी पाणी उपलब्ध करून दिले.
शाळेमध्ये कायमस्वरूपी सोयविद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, शालेय पोषण आहार आणि स्वच्छतागृहासाठी शाळेमध्ये कायमस्वरूपी सोय करण्यात आली. गावकरी आणि शाळेने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे.- मुश्ताक शेख, मुख्याध्यापक
ग्रामस्थांसह तरुणांनी पुढे यावे शाळेला मूलभूत सुविधा देण्याकरिता वाडी दमईकरांनी सहकार्य केले. यापुढेही अशा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ग्रामस्थांसह तरुणांनी पुढे येणे आवश्यक आहे. शाळाविकासासाठी नेहमी प्रयत्न केले जातील.- शिवप्रसाद बिडकर, सरपंच