बेवारस स्थितीत आढळलेली मुले, हरवलेली मुले, पालकांचा शोध न लागलेली मुले आणि नवजात बालकांना सोडून दिल्याने अनाथ झालेल्या मुलांसाठी शासनाच्या वतीने बालगृह चालविले जाते. या बालगृहात मुलांचे संगोपन तर होतेच शिवाय जे दाम्पत्य या मुलांना दत्तम घेऊ इच्छितात त्यांना दत्तक म्हणूनही दिले जाते. मुलांची संपूर्ण काळजी घेण्याची शाश्वती निर्माण झाल्यानंतरच जिल्हा न्यायाधिशांच्या माध्यमातून दत्तक विधानकेल े जाते. या प्रक्रियेतून परभणी जिल्ह्यातील २८ मुलांचे पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. त्यातून अनाथ मुलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील वर्षाची तुलना करता दत्तक विधानचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवरीवरून दिसते. जिल्ह्यात परित्याग केलेल्या मुलांचाही बालकल्याण समिती सांभाळ करते. कुमारी मातेकडून बाळ बेवारस स्थितीत सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. कुमारी मातेने परित्याग केलेल्या बाळास स्वीकारून मातेची माहिती गोपनीय ठेवली जाते.
अशी आहे दत्तक विधान प्रक्रिया
शिशूगृहात बालक दाखल झाल्यानंतर बालकल्याण समितीच्या माध्यमातून दत्तक विधानमुक्त करण्याची प्रक्रिया राबविली जाते. या समितीने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्या बालकाला दत्तक दिले जाते. मुल दत्तक घेण्यासाठी देशपातळीवर सेंट्रल ॲडॉब्शन रिसोर्सेस ॲथॉरिटी हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर पालकांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केल्यानंतर दत्तक घेण्यासाठी असलेल्या मुलांचे छायाचित्रे समोर दिसतात. या छायाचित्रातून आवडलेले मूल सलेक्ट केल्यास त्या मुलाचा पत्ता दिला जातो. पालकांच्या संपर्कानंतर जिल्हास्तरावर समिती पालकांची संपूर्ण माहिती घेते. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने दत्तक विधान होते.
मुलाबरोबरच मुलींनाही घेतले जाते दत्तक
मुलांबरोबरच मुलींनाही दत्तक घेणाऱ्या माता-पित्यांची संख्या अधिक आहे. दत्तक घेण्यासाठी मुलगाच हवा असा कोणताही आग्रह नसतो.
परंतु, मुल मिळाल्याचा आनंद या दाम्पत्याला अधिक असतो. त्यामुळे मुलगा दत्तक हवा अशा आग्रहाचे पालक कमी आहेत.
जिल्ह्यात मुलांबरोबरच मुलींचेही दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे दत्तक प्रक्रियेसाठी एकच ऑनलाईन संकेतस्थळ असल्याने देशातील कानाकोपऱ्यातून पालक येतात.
दत्तक घेण्यासाठी दोन-तीन हजारांची वेटींग
बालगृहांमध्ये दाखल झालेल्या बालकांना दत्तक घेण्यासाठी देशभरात दोन-तीन हजार नागरिकांची वेटींग असल्याचे संकेतस्थळावरून स्पष्ट होते. जिल्ह्यात बालगृहातील मुलांची संख्या प्रत्येक महिन्यात वेगवेगळी असली तरी दत्तक घेण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. मागील वर्षी दोन मुले आणि मुलींना दत्तक घेण्यात आले आहे.
गैरकायदेशीर मार्गानेच मुलांना दत्तक देणे आणि घेणे हा गुन्हा ठरतो. त्यामुळे नागरिकांनी गैरकायदेशीर मार्गाने दत्तक प्रक्रिया करू नये. या प्रक्रियेसाठी असलेल्या कायदेशीर मार्गाचाच वापर करावा. त्यासाठी असलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करावी.
-ॲड. संजय केकान, अध्यक्ष बालकल्याण समिती, परभणी