परभणी : जायकवाडी धरणातून रबी हंगामासाठी डाव्या कालव्यात तीन वर्षानंतर पाणी सोडले आहे़ यावर्षीचे पहिल्या आवर्तनाचे पाणी तब्बल २२ वर्षानंतर पाथरी तालुक्यातील वितरिकेच्या शेवटच्या भागात प्रथमच पोहचले आहे.
पाथरी तालुक्यातील वरखेड येथील कालवा १२२ पासून सुरू होतो़ जायकवाडी उपविभाग पाथरी अंतर्गत ७ शाखांना डाव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचा लाभ होतो़ यावर्षी पैठण येथील जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे़ जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे़ तालुक्यातील शेतकरी बोंडअळीग्रस्त कापसामुळे त्रस्त झाले आहेत़ त्यामुळे अनेक शेतकर्यांनी कापूस उपटून ऊस पिकाची लागवड सुरू केली आहे़ याावर्षी पाणी मिळणार असल्याने यावर्षी ऊस क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे़
पाथरी उपविभागातील ७ शाखेअंतर्गत सिंचनासाठी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी पहिल्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले़ तब्बल २३ दिवस डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले़ १८ डिसेंबर रोजी पहिले आवर्तन बंद करण्यात आले़ यावर्षी प्रथमच २२ वर्षानंतर तालुक्यातील शेवटच्या भागापर्यंत डाव्या कालव्याचे पाणी पोहचले आहे़ त्यामुळे या भागातील शेतकर्यांना २२ वर्षानंतर या पाण्याचा लाभ मिळाला आहे़ पाणी मिळाल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे़ यामुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नादुरुस्तीने वंचित
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाथरी तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येते़ तब्बल तीन वर्षे या भागाला पाणी मिळाले नव्हते़ अनेक वेळा जायकवाडी धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्याने तर चार्या नादुरुस्त असल्याने शेवटपर्यंतच्या भागातील शेतकर्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागले होते़
२२ वर्षानंतर गुंज वितरिकेच्या गुंज, गौंडगाव, उमरा तर लिंबा वितरिकेच्या लिंबा, कानसूर, तारुगव्हाण, डाकु पिंप्री, कुंभारी वितरिकेच्या कुंभारी, मुदगल शिवारामध्ये वितरिका ६१ वरील रामेटाकळी, वझूर या भागातील वितरिकेच्या शेवटच्या टोकाकडील शेतकर्यांना पाणी मिळाले आहे. या भागामध्ये अनेक वर्षानंतर शेतकर्यांनी ऊसाची लागवड सुरू केली आहे़ तसेच सिंचनाचे क्षेत्रही वाढणार असल्याने शेतकर्यांमधून समाधन व्यक्त होत आहे.
दुरुस्ती आवश्यक जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून यावर्षी टेल भागातील शेतकर्यांना पाणी मिळाले आहे़ त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे़ जायकवाडी प्रशासनाने योग्य नियोजन केल्याचा हा परिणाम आहे़ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहचण्यासाठी उपचार्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे़ - मुंजाभाऊ कोल्हे, शेतकरी, उमरा
नियोजन आहे पहिल्या पाणी आवर्तनानंतर ३० डिसेंबरपासून दुसर्या पाणी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे़ हे पाणी टेल भागातून सोडले जाणार आहे़ - खारकर, उपअभियंता, पाथरी (जायकवाडी)