परभणी : जिल्ह्यातील परभणी आणि गंगाखेड या दोन तालुक्यांत शनिवारी सायंकाळी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला़ या प्रयोगानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने परभणी तालुक्यात काही भागात दोन-अडीच तास पाऊस झाल्याचे सांगण्यात आले़ परंतु, प्रत्यक्षात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत घेतलेल्या नोंदीनुसार परभणी तालुक्यात निरंक पावसाची नोंद घेण्यात आली़ त्यामुळे या प्रयोगाने कितपत पाऊस झाला? या विषयी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे़येलदरी व परिसरात १५ सप्टेंबर रोजी दुपारी २़३८ च्या सुमारास कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला़ येलदरी धरण परिसरात दुपारी आभाळ भरून आले होते़कृत्रिम पावसाचा प्रयोग करणाऱ्या विमानाने या ढगांवर फवारणी करण्यात आली़ त्यानंतर येलदरी परिसरात रिमझिम पाऊस झाला़ मात्र धरणाच्या नियंत्रण कक्षामध्ये या पावसाची नोंद अर्धा मिमी एवढीही झाली नसल्याचे स्पष्ट झाले़
कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर अहवाल मात्र निरंक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:48 AM