परभणी, दि. २ : तालुक्यातील मिर्झापूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच मृतदेह ठेवला. आज दुपारी ३ च्या सुमारास हि घटना घडली. अखेर चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा मृतदेह मिर्झापूर येथे नेण्यात आला.
या बाबत अधिक माहिती अशी कि, २० वर्षांपूर्वी बबन ऊर्फ वामनराव चट्टे यांनी किसन वाघमारे यांना अडीच एक्कर जमीन विक्री केली होती. मात्र ही जमीन त्यांनी वाघमारे यांच्या नावे करुन दिली नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. याच वादातून १ आॅक्टोबर रोजी वाघमारे यांना मारहाण झाली, यातच त्यांचा मृत्यू झाला.
शासकीय रुग्णालयात किसन वाघमारे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करावा, आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी नातेवाईकांची मागणी होती. यानंतर रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हा मृतदेह ग्रामीण पोलीस ठाण्यात नेण्यात आला व आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
तसेच वादातील जमीन वाघमारे यांच्या मुलाच्या नावे करुन द्यावी, शासनाच्या वतीने मयताच्या नातेवाईकांना अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी वाकोडे यांनी केली. यावेळी चंद्रकांत लहाने, अरुण लहाने, सिद्धार्थ कसारे, संजय भराडे, संजय सारणीकर, तुषार कांबळे, रमेश भिंगारे, अनिल कांबळे, बी.एच. कांबळे, नारायण वाघमारे, पंडीत टोमके, निलेश डुमने आदींची उपस्थिती होती.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखलवाघमारे यांची मुलगी मथुराबाई बचाटे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन बबन ऊर्फ वामन माणिक चट्टे, भगवान चट्टे, ज्ञानोबा चट्टे, लक्ष्मण चट्टे (रा.मिर्झापूर) या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर रेड्डी करीत आहेत.