पूर्णा (परभणी) : तालुक्यातील शेती आखाड्यावर असलेल्या पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूंच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पिंपळगाव, देऊळगाव या नदीकाठच्या गावानंतर आता देवठाणा येथेही काल रात्री हिंस्त्र पशूने गायीच्या बछड्यावर हल्ला चढवत फडशा पाडला. यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
मागील ५ दिवसांमध्ये तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर, देऊळगाव दुधाटे येथे शेतातील जनावरांवर हल्ला झाला होता. तसेच या भागात बिबट्या सदृश्य प्राण्याचे वास्तव असल्याच्या खुणा आढळून आल्या. यानंतर सोमवारी रात्री देवठाणा येथे पिराजी जोगदंड यांच्या शेतातील गायीच्या पिल्लावर हिंस्र पशु कडून प्राणघातक हल्ला झाला. या परिसरातील आठवड्याभरात ही तिसरी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती आहे.
देऊळगावात बिबट्यानसून तरस दरम्यान या तिन्ही घटनांचे परभणी वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामे केले. यानंतर वन विभागाने पिंपळगाव व देऊळगाव येथे हल्ला करणारा पशु वाघ किंवा बिबट्या नसून तरस असल्याचा निर्वाळा दिला. तसेच आज सकाळी देवठाणा येथे वनपाल चंद्रा मोघे यांच्या पथकाने सकाळी भेट देऊन पुरावे जमा केले आहेत. यासोबतच वन विभागाकडून या परिसरात झालेले हल्ले तरस या प्राण्याने केले आहेत, तो लहान प्राण्यावर हल्ला करू शकतो असे सांगण्यात येत आहे. तरीही या प्राण्याची या भागातील प्रमाण किती आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.
ग्रामस्थांनी काळजी घ्यावी गाईच्या कारवडीवर हल्ला करणारा हिंस्त्र पशु हा बिबट्या असू शकतो. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी शेती आखाड्यावर थांबू नये तसेच सुरक्षतेसाठी शेकोटीचा वापर करावा.- डी.के.डाखोरे, वन परिक्षेत्र अधिकारी, परभणी