चारठाणा (जि.परभणी) : जिंतूर - जालना महामार्गावरील चारठाणा पुलावर ट्रक आयशरला मागून धडकून पुलाखाली चाळीस फुट नदीपात्रात कोसळला. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून शनिवारी सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, ट्रकची केबिन तोडून चालकाला बाहेर काढण्यात आले. यात चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्याचा सहकारीदेखील गंभीर जखमी झाला तर आयशर चालकाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.
याबाबत माहिती अशी, ट्रक क्र. (एपी १६ टीएफ ६३४५) हा लाकडी साहित्य घेऊन धुळे येथून आंध्र प्रदेशात जात होता. चारठाणा गावच्या पुलाजवळ हा ट्रक आला असता समोरील (एमएच १५ जीव्ही ६२६७) क्रमांकाच्या आयशरला मागून धडकून हा ट्रक पुलावरील कठडे तोडून ४० फूट खोल नदीपात्रात कोसळला. या अपघाताची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. अपघातात ट्रकचालक कृष्णा सत्यनारायण (५०) याचे दोन्ही पाय केबिनमध्ये अडकल्याने निकामी झाले तर त्याचा सहकारी यामू नागराज (४८, रा. दोन्ही पालकोटा, आंध्र प्रदेश) येथील आहेत. अपघातात आयशर चालक नवनाथ उगले (४५, रा.पंचवटी, नाशिक) याच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली. ट्रकमधील दोघांना चारठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून चालक इसाकोद्दीन शेख यांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जिंतूरला प्राथमिक उपचार करून ट्रकमधील दोघांना गंभीर दुखापत झाल्याने परभणी येथे तातडीने हलविलण्यात आल्याची माहिती आरोग्य सूत्रांनी दिली.
सैन्यदलातील जवानांची घटनास्थळी मदतअपघात घडल्यानंतर हिंगोली येथील सैन्य दलातील कॅप्टन व त्यांचे सहकारी संभाजीनगर येथे काही कामानिमित्त जात होते. अपघात घडल्याचे त्यांच्या नजरेस पडले. दरम्यान, सैन्यदलाचे प्रमुख तुकाराम मुकाडे यांनी सहकारी सैन्य दलातील जवान फिरदोसखाँ पठाण (रा. हिवरा रोहिला, जि.वाशिम) यांनी ट्रकच्या दिशेने धाव घेऊन ट्रकमध्ये अडकलेल्या दोघांना नागरिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले. विशेष म्हणजे सदर सैन्य दलाचे जवान फिरदोस खान पठाण हे हिंगोलीत एका अकादमीत गरीब विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग देण्याचे काम करतात. काही कामानिमित्त ते हिंगोली येथून छत्रपती संभाजीनगर येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातानंतर चारठाणा येथील सहायक पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड, सपोउपनि. माणिक कुलकर्णी, रमेश गिराम, चारठाणा येथील शेख गफार यांच्यासह नागरिकांनी मदत कार्य करून जखमींना बाहेर काढले.