मानवत: अवैध सावकारीची तक्रार प्राप्त झाल्याने सहकार विभागाच्या पथकाने आज सकाळी साडेआठ वाजता शहरातील पाळोदी रस्त्यावरील एका घरावर धाड टाकली. यावेळी पथकाने काही संशयास्पद कागदपत्रे जप्त केली असून पुढील तपास सुरु आहे.
मानवत शहरातील बाबासाहेब नामदेव साबळे हे अवैध सावकरी करत असल्या संदर्भात सहकार विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने जिल्हाधिकारी अंचल गोयला पोलीस अधीक्षक आर रागसुधा, विभागीय सह निबंधक मुकेश बारहाते जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव, पो.नि. दीपक दंतुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी साहाय्यक निबंधक एम. बी. धुमाळ यांचे पथक आज सकाळी साडेआठ वाजता साबळेच्या घरी धडकले.
पथकाने तब्ब्ल ३ तास घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी काही संशयास्पद कागदपत्रे पथकाच्या हाती लागली. या कागदपत्रांची तपासणी सुरू असून पुढील कारवाईचा अहवाल जिल्हा उपनिबंधक यांना सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, सावकारी सिद्ध झाल्यास महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली. ही कारवाई प्रभारी सहाय्यक निबंधक एम बी धुमाळ, शेख उस्मान, अल्का जवळेकर, एस. एन. पुंजारे, पी. यू. वारे, सपोउनि सुभाष नाईक, पोह नारायण सोळंके, एस. टी. शेख, महिला पोलिस कर्मचारी एस. बी. शेख यांच्या पथकाने केली.
अवैध सावकारी संदर्भात तक्रार दाखल करावीविनापरवानगी सावकारकी करणाऱ्या व्यक्ती सोबत कोणत्याही प्रकारे आर्थिक देवाणघेवाण करु नये. अवैध सावकारी संदर्भात कोणाची तक्रार असल्यास पुराव्यासह सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहन प्रभारी सहाय्यक निबंधक एम. बी. धुमाळ यांनी केले आहे.