परभणी : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एका गावात घराबाहेर हाकलून देण्याची धमकी देत चुलत्यानेच पुतणीवर अडीच वर्षे अत्याचार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात चुलत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी घरातून पळून आलेली पीडित मुलगी परभणी येथील रेल्वे स्थानकावर एकटीच थांबली होती. या मुलीविषयीची माहिती चाईल्ड लाईनच्या पथकाला मिळाल्यानंतर चाईल्ड लाईनचे पथक तसेच आर.पी.एफ. आणि जीआरपीएफ पोलिसांच्या मदतीने या मुलीशी संपर्क साधण्यात आला. तिला चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात आले. चाईल्ड लाईनच्या समन्वयकांनी मुलीचे समुपदेशन केले.
तेव्हा तिने घडलेला प्रकार चाईल्ड लाईनजवळ सांगितला. त्यानंतर या मुलीस सखी वन स्टॉप सेंटरकडे देण्यात आले. या प्रकरणी पीडित मुलीने नानलपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. तिच्या तक्रारीनुसार मुलीचे आई-वडील मयत झाल्याने ती आजी-आजोबांकडे राहत होती. आजी-आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात राहणाऱ्या काकांकडे मुलीला सुपूर्द करण्यात आले. त्या ठिकाणी ५ डिसेंबर २०१९ पासून चुलत्याने मुलीवर बळजबरी केली. त्यानंतर चुलत्याने वारंवार अत्याचार केला. कोणाला सांगितले तर घरातून हाकलून देईल, अशी धमकी पीडित मुलीला देण्यात आली.
मात्र, त्यासाठी घरात त्रासही दिला जात होता. त्यामुळे मुलीने तेथून पळ काढत परभणी गाठले. परभणीत चाईल्ड लाईन आणि वन स्टॉप पथकातील कर्मचाऱ्यांनी समुपदेशन केल्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून पीडित मुलीच्या काकाविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी नांदेड पोलिसांकडे सोपविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.