पाथरी (परभणी ) : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटत आहे़ फक्त धान जोपासणारा पाऊस पडत असल्याने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी काळात जोरदार पाऊस पडला नसल्याने गोदावरी नदीच्या पात्रात अद्याप पूर आला नसल्याने दोन महिन्यानंतरही तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल बंधारे कोरडेठाक आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या पाऊसाची प्रतीक्षा कायम आहे़
पाथरी तालुक्यात मागील तीन ते चार वर्षापासून सतत दुष्काळ पडत आहे़ गतवर्षी या भागात पावसाळ्यात सुरुवातीला दोन महिने पाऊस पडला होता़ आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पडलेल्या पाऊसानंतर पाऊस न पडल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती़ तसेच जायकवाडी धरणात पाणी नसल्याने डावा कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही़ त्यामुळे बागायती पिकांना मोठा फटका बसला होता़ यावर्षी सुरुवातीला तालुक्यातील काही भागात पाऊस पडल्याने वेळेत खरिपाच्या पेरण्या झाल्या तर अर्ध्या भागात म्हणजेच बाभळगाव पट्टयात पाऊस पडला नाही़ यामुळे उशिरा तर काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली आहे़
मागील आठ दिवसापासून ढगाळ वातावरण असताना जोरदार पाऊस पडत नाही़ पाऊस कमी असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी अद्याप वाढली गेली नाही़ तसेच नदी नाल्यांना पूरही आला नाही़ जुलै महिना संपला, तरी मोठा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे़ पाथरी तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रात उच्च पातळीचे ढालेगाव आणि मुदगल येथे बंधारे आहेत़ या दोन्ही बंधाऱ्यावर गोदाकाठच्या गावातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे़ दोन्ही बंधारे अद्यापही कोरडेठाक आहेत़