जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटल्याने अनलॉक टप्प्यांमध्ये बाजारपेठेतील व्यवहाराने सुरू केले जात आहेत. मागील आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.३० टक्क्यांवर येऊन ठेपला. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात सर्व व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर शहरातील बाजारपेठ सायंकाळी सहा वाजल्यानंतरही सुरू होती. दुकानांमध्ये रात्री नऊ वाजेपर्यंत व्यवहार झाले. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, बाजारपेठेतील व्यवहारही आता पूर्वपदावर आले आहे.
बाजारपेठ भागातील गर्दी ओसरली
संचारबंदी काळात बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी अधून-मधून शिथिलता दिली जात होती. त्यावेळी ग्राहकांची मोठ्या संख्येने बाजारपेठेत गर्दी होत होती. मात्र, सोमवारी चित्र उलट दिसले आहे. जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात झाल्याने परभणी जिल्ह्यातील बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे सोमवारी दिवसभरात बाजारपेठेत गर्दी झाली नव्हती. रस्त्यांवरील वाहतूकही सर्वसाधारण असल्याचे दिसून आले. एकंदर व्यवहार पूर्वपदावर आल्याने व्यापारी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.