सोनपेठ ( परभणी ) : तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेंटीवन शुगर या कारखान्याकडे मागील वर्षीचे उसाच्या बील थकीत आहे. थकीत बील त्वरित मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज सकाळपासून कारखान्याच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले.
सोनपेठ तालुक्यातील सायखेड येथील ट्वेंटीवन शुगर या खाजगी साखर कारखान्याच्या गेल्या गळीत हंगामाच्या थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुकाणु समितीच्या विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याच्या मुख्य ईमारतीत ठिय्या मांडला. सुरुवातीला कारखान्याच्या प्रवेशद्वारावर बसलेल्या शेतकऱ्यांना दोन तास बसूनही कारखाना प्रशासनाने कुठलीही विचारपूस केली नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्यात शिरत मुख्य गेटवर ठिय्या मांडला. गेल्या हंगामातील प्रती टन 500 रु थकीत बिल जमा केल्या शिवाय शेतकऱ्यांनी उठणार नसल्याचे घोषित केले. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली.
शेतकऱ्यांनी लेखीस्वरुपात ठोस आश्वासन मिळेपर्यंत कारखाना सोडणार नसल्याचे जाहीर केले. आंदोलनात शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे सुधीर बिंदु, गणेश पाटील, विश्वंभर गोरवे, सुशील रेवडकर , माऊली जोगदंड, सोमनाथ नागुरे, रामेश्वर मोकाशे,परमेश्वर वाघ, मदनराव वाघ, रमेशराव मोकाशे, नंदकुमार जोगदंड, नवनाथ वाघ, कपिल धुमाळ, राधाकिशन सुरवसे, दिपक बिडगर, रामभाऊ सुर्यवंशी, ज्ञानोबा वाघ, माधव लांडगे, मदन बल्लाळ, कृष्णा बल्लाळ, शिवाजी सोनवणे, रावसाहेब मोरे, शिवसांब लोखंडे, सुर्यभान कोपणर सह मोठ्या संख्येने जिल्हाभरातील ऊस उत्पादन शेतकरी उपस्थित होते.