परभणी : राज्याला दुसरे लॉकडाऊन बिल्कुल परवडणारे नसून, नागरिकांनी स्वत:हून मास्क, फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आता कुठे सुरळीत होत असलेली आर्थिक घडी पुन्हा विस्कळीत होऊ नये, यादृष्टीनेच योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊन सुरु होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. नागरिकांनी स्वत:हून फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर केला तर लॉकडाऊन करण्याची वेळच येणार नाही. त्यामुळे या नियमांची प्रशासनाने कडक अंमबलजावणी करावी. मात्र, लॉकडाऊन नको, असे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
मागील लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेली आर्थिक स्थिती आता कुठे पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय निवडला तर मोठे नुकसान सहन करावे लागेल. शिवाय लॉकडाऊनमुळे कोरोनाला आळा बसेल? याची शाश्वती नसल्याने केवळ स्वत:ची काळजी घेत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
धोका वाढतोय
जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी १००पेक्षा कमी असलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आज मात्र १७०वर पोहोचली आहे. दररोजचे रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे हा संसर्ग पुन्हा डोके वर काढत असून, नागरिकांनीच स्वत:ची, परिवाराची आणि समाजाची काळजी घेणे गरजेचे आहे.
नागरिकांना कोरोना समजला आहे. त्याचा प्रतिबंध कसा करायचा? याचीही चांगल्याप्रकारे माहिती झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनऐवजी कोरोनाविषयक नियम पाळणे आवश्यक आहे.
- ओमप्रकाश डागा, उद्योजक
शासनाने कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली असून, नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत कोरोनाचा प्रतिबंध करणे गरजेचे आहे.
- नंदकिशोर बिहाणी, उद्योजक
आता कुठे उद्योग पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. मास्क, सोशल डिस्टन्स या नियमांचे कडक पालन केले तर कोरोनाला प्रतिबंध होऊ शकतो.
- विजय बिहाणी, उद्योजक