परभणी : जिल्ह्यातील गायरानधारकांच्या प्रश्नांसंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने राज्य संघटक डी.एन. दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील मागासवर्गीय, भूमिहीन व्यक्तींनी १ एप्रिल १९७८ ते १४ एप्रिल १९९० या कालावधीत शासकीय पडीक व गायरान जमिनी शेतीसाठी वहिती केली असेल तर शासन निर्णयाप्रमाणे सदरील अतिक्रमण नियमित करावे, असे शासनाचे आदेश आहेत. असे असतानाही जिल्ह्यात या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात नाही. त्यामुळे पात्र लाभार्थी शासन निर्णयापासून वंचित राहत आहेत. शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रिपाइं आठवले गटाच्या वतीने राज्य संघटक डी.एन. दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राणूबाई वायवळ, जयप्रकाश इंगोले, निवृत्ती हत्तीअंबिरे, शेषराव नंद, महादेव साळवे, विठ्ठल उजगरे, डी.एम. झोडपे, साहेबराव तायडे, नाथाभाऊ चव्हाण, रंगनाथ वाकळे, मुसा शेख आदींनी सहभाग नोंदविला.