परभणी - मनपा प्रशासनाच्या धोरणाविरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
होर्डिंग व जाहिरात फलकाबाबतच्या ठरावास १ मेपर्यंत स्थगिती द्यावी, फेरीवाला कायदा २०१४ च्या तरतुदीच्या आधारे शहरातील फेरीवाल्यांची रोजीरोटी सुरक्षित करून बेदखल केलेल्या वसमत रस्त्यावरील फेरीवाल्यांना पुनर्स्थापित करावे, शासकीय कार्यालयात अपमानास्पद वागणुकीस प्रतिबंध घालावा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी वाॅर्डात फलक, झेंडे, बॅनर, होर्डिंग लावण्यासाठी विनाशुल्क परवानगी द्यावी, त्याचबरोबर मनपा प्रशासनाच्या जनविरोधी धोरणाचा निषेध करत सोमवारी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, सुधीर साळवे, राहुल घनसावंत, मिलिंद सावंत, किरण घोंगडे, राजकुमार सूर्यवंशी, डॉ. सुनील जाधव, ॲड. यशपाल कदम, प्रदीप वावळे, शेषराव जल्लारे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.