परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबरपासून धरणे आंदोलन उभारण्यात आले आहे. पहिल्या दिवशी युवकांनी धरणे आंदोलन केले. २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील हजारो महिलांनी चार तास धरणे आंदोलन केले. खा.बंडू जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजली आनेराव, क्रांतीताई जाधव, सावित्री चिताडे, मंगलाताई कथले, सखुबाई लटपटे, काँग्रेसच्या मलेका गफार, दुर्राणी पठाण, द्वारकाबाई कांबळे, जानुबी, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, डॉ. विवेक नावंदर, गंगाप्रसाद आनेराव, अतुल सरोदे, अर्जुन सामाले, संजय सारणीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे', 'शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आमच्या हक्काचे', अशा घोषणा युवती आणि महिलांनी दिल्या. प्रारंभी प्रणिता देशपांडे व मनीषा उमरीकर यांनी 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर अन्नुकुमार व शाहीर प्रकाश कांबळे यांच्या संचाने परभणीच्या रुग्णालयाच्या अवस्थेवर एक नाटिका सादर केली. रावराजूर येथील प्रकाश डिकळे व सारंगधर पवार या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तत्पूर्वी ॲड.माधुरी क्षीरसागर, सुहासिनी कावळे, हेमाताई रसाळ, शिवसेनेच्या अंबिका डहाळे, जयश्री देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदाताई राठोड, सुशीलाबाई निसर्गन, पठाण नाजनीन यांनी मनोगत मांडले. प्रा.डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले.
मेडिकल कॉलेजसाठी महिला उतरल्या आंदोलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:19 AM