परभणी : शहरातील गंगाखेड रोड उड्डाणपूल परिसरात एका घराला आणि इलेक्ट्रिशन दुकानाला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. या घटनेनंतर अग्निशमन दलाने धाव घेत शर्थिचे प्रयत्न करत एका तासांत आग आटोक्यात आणली. यामध्ये घर आणि दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे.
शहरातील उड्डाणपूल परिसरात गंगाखेड नाका जवळ चाऊस इलेक्ट्रिशन नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या शेजारी असलेल्या एका पत्राच्या घरामध्ये गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समोर आले नाही. घरामधील आगीचे लोट हे दुकानातील साहित्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.
दरम्यान, चाऊस इलेक्ट्रिशनच्या बाजूला असलेल्या रॉयल मोटर्स या दुकानाला सुद्धा आगीने वेढले होते. परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन दलाला दिली. घटनास्थळी दहा मिनिटात अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले. मनपा अग्निशमन विभागाचे वाहनचालक वसिम अखिल अहमद, फायरमन मदन जाधव, रोहित गायकवाड यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे सव्वादहाच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आली. रात्री पावणे अकरापर्यंत संबंधित दुकान मालकांसह बघ्याची गर्दी झाली होती. कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. यामध्ये घरातील एका जखमी झालेल्या महिलेस पोलीस कर्मचारी कसबे यांच्यासह इतरांनी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.