परभणी : परभणी महानगरपालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार असली तरी ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढवावी, असे साकडे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घातले.
परभणी महानगरपालिकेची निवडणूक दीड वर्षानंतर होणार आहे. असे असले तरी या निवडणुकीची तयारी आताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याचे संकेत पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबईत वरिष्ठ नेत्यांशी केलेल्या संवादावरून स्पष्ट झाले आहे. माजी महापौर प्रताप देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते जाकेर अहमद खान, मोईन खान, माजी शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, शेख अब्दुल, नईम शेख, ॲड. अमोल पाथरीकर, शेख बाबामियाँ आदींच्या शिष्टमंडळाने गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांना प्रताप देशमुख हे महापौर असताना त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली. तसेच २०२२ मध्ये होणारी महानगरपालिकेची निवडणूक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवावी. मनपात पक्षाची एकहाती सत्ता येईल, असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वासित करण्यात आले.