Ajit Pawar ( Marathi News ) :परभणी लोकसभा मतदारसंघातून आज रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला जाईल आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा अनेक महिन्यांपासून रंगत होती. मात्र ऐनवेळी महादेव जानकर यांचा महायुतीत समावेश करण्यात आला आणि त्यांना परभणीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राजेश विटेकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज महादेव जानकर यांच्यासाठी घेण्यात आलेल्या महायुतीच्या सभेत अजित पवार यांनी विटेकर यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला आहे.
राजेश विटेकर यांना आश्वस्त करताना अजित पवार म्हणाले की, "मी राजेश विटेकर यांना लोकसभा निवडणुकीची तयारी करायला सांगितली होती. त्यानुसार मागील सहा महिन्यांपासून ते मतदारसंघात फिरत होते. मात्र आता महायुतीत ही जागा आपल्याला महादेव जानकर यांना सोडावी लागत आहे. असं असलं तरी मी परभणीकरांना शब्द देतो की, पुढील सहा महिन्यांत मी राजेश विटेकरांना विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय राहणार नाही," असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.
दरम्यान, महायुतीच्या उमेदवाराला परभणी लोकसभा मतदारसंघात चांगला पाठिंबा मिळत असून महादेव जानकर हे विजयी होतील, असा विश्वास राजेश विटेकर यांनी व्यक्त केला आहे.
राजेश विटेकर यांची राजकीय कारकीर्द
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत असलेल्या राजेश विटेकर यांनी परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. तसंच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणूनही विटेकर यांनी काम केलं आहे. मात्र राजेश विटेर हे राज्यभर चर्चेत आले ते त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांना दिलेल्या चुरशीच्या लढतीमुळे.
परभणी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संजय उर्फ बंडू जाधव हे विद्यमान खासदार आहेत. मात्र मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांनी जाधव यांना चांगली लढत दिली होती. त्यामुळे महायुतीकडून यंदा राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. परंतु आता महादेव जानकरांच्या महायुतीतील समावेशाने विटेकर यांचा पत्ता कट झाला आहे.