परभणी : जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीत चारही मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठी चुरस असताना चारही विद्यमान आमदारांनी आपली उमेदवारी टिकविण्यात यश मिळविले आहे. आता पुन्हा आमदारकी पटकाविण्यासाठी धडपड सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
परभणी विधानसभेत उद्धवसेनेचे आ. डॉ. राहुल पाटील यांना पक्षातच नव्हे, तर मित्रपक्षातही कोणी स्पर्धक नव्हता. त्यामुळे ही उमेदवारी निश्चित मानली जात होती. हीच गत जिंतूरमध्ये भाजपच्या आ. मेघना बोर्डीकरांच्या उमेदवारीलाही फारसा अडसर नव्हता. पाथरीत मात्र आ. सुरेश वरपूडकर यांच्यापेक्षा मित्रपक्षातील राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनीच उमेदवारीची जास्त हवा केली होती. शेवटी उमेदवारी वरपूडकर यांनाच मिळाली. मात्र या मतदारसंघात यावरून उलटसुलट चर्चांना उधाण येत होते. गंगाखेड विधानसभेत तर याहीपेक्षा विचित्र प्रकार घडला. या मतदारसंघात रासपचे आ. रत्नाकर गुट्टे यांना रासपकडून उमेदवारी निश्चित होती. मात्र, रासपने महायुतीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे गुट्टे भाजपकडून उमेदवारी घेणार की रासपकडून उभे राहणार आहेत, यावर चर्चा रंगली होती. महायुतीचे सहकार्य न घेतल्यास तेथे महायुतीचा उमेदवार भाजपकडून टाकला जाण्याची शक्यता होती. मात्र, रासपची उमेदवारी व महायुतीने त्यांना पुरस्कृत करून भाजपच्या मंडळीच्या आशेवर पाणी फेरले. दुसरीकडे जिल्ह्यात इतर दोन ठिकाणी रासपने उमेदवार दिले असून, हाही चर्चेचा विषय आहे. या आमदारांनी उमेदवारी टिकविली तरी आता जनतेच्या दारात पुन्हा जाऊन आमदारकी टिकविण्याचे आव्हान आहे. ते कोण कोण पेलणार? हे आगामी काळात कळणारच आहे.
जिल्ह्यात तीन उमेदवारांची माघारपरभणी जिल्ह्यात चार मतदारसंघात तिनी जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. जिल्ह्यात एकूण १५० जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. यापैकी तीन जणांनी माघार घेतल्याने अजूनही १४७ उमेदवार रिंगणात राहणार आहेत. ४ नोव्हेंबर ही अंतिम तारीख असल्याने या दिवशीच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.