परभणी- महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी बुधवारी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारून काम बंद आंदोलन केले़ त्यामुळे दिवसभराचे कामकाज ठप्प झाले होते़
राज्य शासनाने महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे़ सातवा वेतन आयोग लागू करताना मनपा सर्वसाधारणमध्ये ठराव घेणे बंधनकारक करण्यात आले़ मागील आठवड्यात महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली़ या सभेत सातव्या वेतन आयोगाचा ठराव चर्चेसाठी ठेवला होत़ परंतु, महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे कारण देत ठराव रद्द करण्यात आला़ त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न रखडला आहे़ दरम्यान, याच प्रश्नावर बुधवारी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास मनपातील सर्व कर्मचारी बाहेर पडले़ सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मगणी यावेळी करण्यात आली़ वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने मनपातील कामकाज ठप्प झाले होते़ दरम्यान, आयुक्त रमेश पवार हे मुंबई दौऱ्यावर आहेत़ त्यामुळे या संदर्भात बुधवारी निर्णय होवू शकला नाही़ त्यामुळे दिवसभर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले़