शहरात प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात अजूनही प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केला जात आहे. राज्यात प्लास्टिक वापरास बंदी असताना त्याचा सर्रास वापर सुरू आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक बंदीविरोधी मोहीम बंद केल्यानंतर हा वापर वाढविला आहे. भाजी, फळे विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जात आहेत.
रस्त्याच्या कडेला साचला कचरा
परभणी : शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला कचरा साचला आहे. कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत. मात्र, त्यातील कचरा रस्त्यावर पसरत आहे. नियमितपणे कुंडीतील कचरा उचलला जात नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देऊन नियमितपणे कचरा उचलावा, अशी मागणी होत आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढले अपघात
परभणी : जिल्ह्यात मुख्य रस्त्यांसह शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गंगाखेड, वसमत, पाथरी या राष्ट्रीय महामार्गांच्या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक वेळा वाहनधारकांना किरकोळ अपघात होत आहेत. मानवत तालुक्यातील कोल्हा पाटी ते परभणी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कंत्राटदारांनी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
बसपोर्ट उभारणीच्या कामाला वेग
परभणी : येथील बसस्थानक भागात बसपोर्ट उभारणीच्या कामाला वेग आला आहे. सहा महिन्यांपासून हे काम ठप्प होते. ते पंधरा दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. परभणी शहरासाठी बसपोर्ट मंजूर झाले असून, त्याची उभारणी झाल्यानंतर प्रवाशांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. तेव्हा या कामात खंड न पडता ते त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.