परभणी : जिल्ह्यासह राज्याचे राजकीय गणित दिवसागणिक बदलत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात नेमकं कोण कुणाच्या विरोधात उभे राहते, याचा अंदाज बांधला जात नसल्याची स्थिती आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या ॲड. प्रकाश आंबेडकरांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेक तर्क-विर्तकांना उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांनी जर लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचे निश्चित केल्यास याचा मोठा प्रभाव इतर राजकीय पक्षांवर पडू शकतो. राजकीयदृष्ट्या याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीलाच बसण्याची शक्यता आहे. कारण २०१९ मधील परभणी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जवळपास दीड लाख मते घेतली होती. त्यामुळे जरांगे पाटलांनी जर वंचितसोबत निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले तर दोन्ही नेत्यांचे अस्तित्व नजरेआड करता येणार नाही.
परभणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुरूवारपासून (दि. २८) नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरूवात झाली असून, इच्छुक उमेदवारांना ४ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल. मात्र, अद्यापही निवडणूक रिंगणात कोण कुणाविरुद्ध असणार, याबाबत संभ्रम असल्यामुळे लोकसभेच्या आखाड्यात अद्यापही रंगत आलेली नाही. बुधवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची घोषणा झाल्याने एका बाजूने अधिकृतरीत्या संजय जाधव हे उमेदवार म्हणून पुढे आले. मात्र, महायुतीचे अद्यापही त्रांगडेच असल्यामुळे नेमकी ही जागा कोणत्या पक्षाला जाते, यावर तर्कवितर्क लावले जात आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. परंतु, महायुतीने अद्यापही आपले पत्ते खुले केले नसल्याने इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळपास आली होती. कारण गत काही निवडणुकींचा विचार करता शिवसेनेविरुद्ध आजपर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार लोकसभेच्या आखाड्यात होता. मात्र, यावेळी राजकीय गणित बदलल्यामुळे ही जागा नेमकी महायुतीत राष्ट्रवादीला जाते की भाजपकडे यावर तर्कवितर्क लावण्यात येत होते. शेवटी राष्ट्रवादी अधिक आग्रही असल्यामुळे परभणीची जागा त्यांनाच जाईल, असे वाटत असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी महायुतीत उडी घेतल्यामुळे पुन्हा संभ्रम वाढला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत दीड लाख मतेगत लोकसभा (२०१९) निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान यांना तब्बल एक लाख ४९ हजार ९४६ मते पडली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा जिल्ह्यात प्रभाव असल्याचे संबंधित निवडणुकीत पुढे आले होते. वंचितमुळे मतांचे विभाजन झाल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा अंदाज आजही बांधला जात आहे.
एकत्र निवडणूक लढण्यास मतांची विभागणीवंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर आणि मराठा आंदोलन नेते मनाेज जरांगे पाटील यांनी जर लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणामी परभणीसह राज्यातील बहुतांश मतदारसंघात दिसून येईल. कारण जातीय समीकरण न पाहता गत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभेच्या रिंगणात जवळपास दीड लाखांच्या मतांचा टप्पा गाठला होता. यात वंचितला जर मनोज जरांगे पाटलांची साथ लाभल्यास मतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीलाच अधिक बसणार असल्याची स्थिती आहे.
आंदोलनामुळे एकवटला समाजमराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे पाटील गत काही महिन्यांपासून लढत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचा प्रभाव निवडणूक काळात कमी लेखता येणार आहे. हजारोंच्या संख्येने जरांगे पाटलांच्या सभेला जिल्हानिहाय मराठा समाजबांधवांची गर्दी दिसून येत होती. लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी मतदारसंघनिहाय एका उमेदवाराची शिफारस करण्याचे निर्देश दिले असून, ३० मार्चनंतर त्यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसात ते कुठला निर्णय घेणार, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.