गंगाखेड: येथील उपजिल्हा रुग्णालयाला महिनाभरापूर्वी नवी कोरी रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली. मात्र परभणी येथील जिल्हा रुग्णालयात केवळ पासिंगअभावी महिनाभरापासून ही रुग्णवाहिका धूळ खात पडून आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रशासन रुग्णांच्या सेवेसाठी किती तत्पर आहे, याची अनुभूती या प्रकारावरून दिसून येत आहे.
परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या नांदेड-पुणे महामार्गावरील गंगाखेड शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. महामार्गावर असलेल्या गंगाखेड परिसरात अपघाताची संख्या अधिक आहे. त्यामुळे या रुग्णालयात गंभीर जखमी रुग्णांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा नांदेड, अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णांना हलविण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज भासते. मात्र मागील चार वर्षांपासून गंगाखेड तालुक्यातील १०६ गावांबरोबरच पालम व सोनपेठ तालुक्यातील बहुतांश गावातील रुग्णांचा भार असलेल्या या उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिकाच उपलब्ध नाही. त्यामुळे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आधार होता. मात्र कोरोना रुग्णांसाठी ही रुग्णवाहिकाही राखीव ठेवण्यात आली. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या गंभीर रुग्णांबरोबरच गरोदर मातांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागतो. तसेच खासगी रुग्णवाहिकेची तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयाला एक नवीन रुग्णवाहिका मिळावी, यासाठी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र आरोग्य उपसंचालक कार्यालयातून गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यासाठी मुहूर्त मिळाला नाही. त्यानंतर रुग्णांची गरज लक्षात घेता आ. रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या फंडातून उपजिल्हा रुग्णालयासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ही रुग्णवाहिका महिनाभरापासून केवळ पासिंगअभावी धूळ खात पडून आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांमधून जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कारभराविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाने चौकशी करण्याची गरज
नांदेड-पुणे महामार्गावर असलेल्या गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयास मागील चार वर्षांपासून रुग्णवाहिका मिळत नसल्याने गंभीर जखमी अवस्थेतील रुग्णांच्या नातेवाइकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अखेर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून का होईना या रुग्णालयाला रुग्णवाहिका उपलब्ध झाली. मात्र केवळ पासिंगअभावी महिनाभरापासून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या रुग्णवाहिकेवर धूळ चढू दिली. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाची चौकशी करावी, अशी मागणी नातेवाइकांमधून होत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांचा प्रतिसाद मिळेना
नव्या रुग्णवाहिकेवर रुग्णालय परिसरात धूळ चढलेली आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या बद्दल अधिक माहिती विचारली असता या कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे बोट दाखविले. त्यामुळे लोकमत प्रतिनिधीने या रुग्णावाहिकेबद्दल शुक्रवार अधिक माहितीसाठी जिल्हा शल्यचिकत्सकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे कॉलला प्रतिसाद दिला नाही.