- गजानन नाईकवाडे ताडकळस : शेतातून परत येत असताना तीन वर्षीय मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार ताडकळस ठाण्यात शुक्रवारी दाखल झाली होती. या घटनेत स्थानिक गुन्हा शाखा व ताडकळस पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी सदरील अपहृत बालकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. या बालकाचा मृतदेह आरोपी महिलांनी त्यांच्या घरातील फरशीखाली पुरला होता. हा मृतदेह मंगळवारी सकाळी तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा करून बाहेर काढण्यात आला.
पूर्णा तालुक्यातील सिद्धेश्वर कळगाव परिसर येथील गणेश भीमराव धोत्रे यांनी शुक्रवारी ताडकळस ठाण्यात फिर्याद दिली होती. ज्यात नमूद केले की, गणेश धोत्रे यांची पत्नी महानंदा ही शेतातून परत येत असताना त्यांचा एकुलता एक मुलगा गोविंद गणेश धोत्रे (३) याचे कुणीतरी अज्ञात ईसमाने अपहरण केले. त्यावरून ताडकळस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. ताडकळस पोलीस या अनुषंगाने तपास करीत होते. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी सदरील घटनेची संवेदनशीलता ओळखून चार पथके तपासासाठी नेमली. नमूद गुन्ह्यातील अपहृत बालक व अज्ञात आरोपीचा शोध ताडकळस ठाण्याच्या हद्दीत घेताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदरील अपहृत बालकास शेजारी राहणाऱ्या कावेरी गजानन बनगर हिने उचलून घेऊन जात त्यास ठार मारून जमिनीत पुरल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या नमूद संशयित महिलेला ठाण्यात बोलवून अपहृत बालकाबाबत विश्वासात घेऊन विचारणा केली.
अंगणात खेळणाऱ्या बालकास नेले उचलूनआमच्या अंगणात गोविंद गणेश धोत्रे हा बालक खेळत असताना त्यास उचलून घेऊन आमच्या घरात नेत जीवे ठार मारून स्वतःच्या घरामध्ये एका कोपऱ्यात पुरले आहे, असे कावेरी बनगर हिने पोलीसांना सांगितले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे कबूल केले. यामध्ये आरोपी कावेरी गजानन बनगर व तिची सासू अन्नपूर्णा बालासाहेब बनगर (दोन्ही रा. सिद्धेश्वर नगर, कळगाव, ता.पूर्णा) यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले.
तहसीलदारांच्या उपस्थितीत केला पंचनामापोलीस पथकाने मंगळवारी सकाळी सदरील आरोपी महिलेच्या घरामध्ये जाऊन तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा केला. त्यामध्ये मयत बालकाचे प्रेत घरातील एका फरशीखाली आढळले. हा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. दोन्ही आरोपी महिलांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेत ताडकळस ठाण्याच्या स्वाधीन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड तपास करीत आहेत.