सोनपेठ (जि. परभणी) : शहरापासून जवळ असलेल्या जुने वाणी संगम येथील गोदावरी नदीतील गाळात गुरुवारी एक मूर्ती आढळून आली. या प्रकारानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. या मूर्तीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
गावातील सोमनाथ काळे व भगवान मस्के पाटील हे दररोज जुने वाणी संगमच्या गोदावरी नदीजवळील श्रीवाघेश्वर मंदिरात दर्शनास जातात. गुरुवारी सकाळी ६:३० वाजता हे दोघे गोदावरी नदीच्या काठी गेले होते. यावेळी नदीत गाळात रुतून बसलेली मूर्ती सोमनाथ काळे यांना दिसली.
ही मूर्ती हातात त्रिशूळ व डमरू घेतलेली असून घोड्यावर बसलेली आहे. ही मूर्ती शैव देवतांपैकी खंडोबाची मूर्ती असल्याचा अंदाज आहे. तिच्या उजव्या हातातील खंडा भग्न झालेला तर डाव्या हातात पान पात्र आहे. मूर्ती भग्न झाल्याने ती विसर्जित करण्यात आली असावी.