परभणी - मी कृषीमंत्री असताना यवतमाळमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. विदर्भातील शेतक्ऱ्यांच्या आत्महत्येचं मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंगांना सांगितल.देशातला माझा बळीराजा आत्महत्या करतोय, तुमची आणि माझी जबाबदारी आहे, त्याची चौकशी करायची,याचं कारण शोधण्याची, त्यामध्ये धोरणात्मक बदल करण्याची. त्यानंतर, दुसऱ्यादिवशी मी आणि पंतप्रधान लातूर आणि यवतमाळला गेलो. त्या कुटुंबातील पीडित माऊलीची मन हेलावणारी कथा ऐकून मी शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
परभणी येथील लोकसभा उमेदवाराच्या प्रचारावेळी शरद पवारांनी 70 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची आठवण सांगितली. यवतमाळमधील शेतकऱ्याच्या आत्महत्येसंदर्भात मी मनमोहनसिंग यांना सांगितलं. त्यानंतर, दुसऱ्याचदिवशी मी आणि पंतप्रधान लातूरला गेलो, यवतमाळला गेलो. त्या कुटुंबाला भेटलो, घरी गेलो तेव्हा माऊली रडत होती. तिला विचारलं का एवढं टोकाच पाऊल तुझ्या नवऱ्यानं घेतलं. रडत रडतच त्या माऊलीनं सांगितलं. पीक पाण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. बी-बीयाणं घेऊन पेरणी केली. पण, लागोपाठ दोन वर्ष पाऊस नाही पडला. दोन वर्ष दुष्काळ पडला, शेती उद्धवस्त झाली. पण, कर्जाच ओझ बाकी राहिलं, कर्ज उद्धवस्त नाही झालं. बँकेतील अधिकाऱ्यांनी कर्जामुळे घरावर जप्तीचा आदेश काढला. घरात एकुलती एक मुलगी होती, तीही लग्नाला आलेली. मुलीच्या लग्नासाठी मालकानं थोडीशी रक्कम जमवली होती. मात्र, जप्तीच्या अधिकाऱ्यांनी घरावर धाड टाकली.घरात मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली रक्कमही जप्तीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. घरातली भांडीकुंडी बाहेर काढली. माझ्या मालकाला हे सहज झालं नाही.आता माझ्या पोरीचं लग्न कसं होईल. तो एकच म्हणत होता. माझ्या अब्रुचा पंचनामा झाला, पै-पावण्यात माझी बेअब्रु झाली. त्यामुळं, एका रात्री कपाशीसाठी आणलेल एंडरिल तो प्याला अन् त्यान जीव सोडला. त्या माऊलीच दु:ख ऐकून मग आम्ही दोघं दिल्ली गेलो. दिल्लीत गेल्यानंतर मी पंतप्रधानांना सांगितल ही आपली जबाबदारी आहे.
हिंदुस्तानात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असेल, तर सरकार म्हणून ती तुमची अन् माझी जबाबदारी आहे. मोठ्या मोठ्या उद्योगपतींना बँकेकडून शेकडो कोटी रुपयांची सूट दिली जाते. पण, एकर दोन एकर शेतकऱ्यांच्या डोक्यावर त्याचं पीक उद्धवस्त झालं, तर त्याला आम्ही कवडीची किंमत करत नाही, देशातलं हे चित्र बदललं पाहिजे. त्यावेळी एका हुकुमाने देशातील शेतकऱ्यांवरील 70 हजार कोटींचं कर्ज माफ केलं, अशी एक आठवण पवार यांनी आपल्या परभणीतील भाषणात सांगितली.
विशेष म्हणजे, नुसतंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही केलं, तर व्याजाचे दर कमी केले. शेतमालाच्या किमती वाढवल्या. त्याचा परिमाण म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या. परदेशातून धान्य आयात करणारा देश जगातील 15 देशांना धान्य निर्यात करू लागला. देशातील बहाद्दर शेतकऱ्याने हे करुन दाखवलं, कारण शेतमालाला चांगला भाव मिळाला. त्यानंतर, सरकार बदलल, मोदीसाहेबांचं सरकार आलं, सक्तीची वसुली, शेतीमालाची किंमत नाही, शेतकऱ्यांच दु:खणं दूर करत नाहीत, असे म्हणत पवारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी मोदींना जबाबदार धरलं.