भूखंडासाठी जागा उपलब्ध करून द्या
बोरी : जिंतूर तालुक्यातील गोंधळा, नागठाणा व गणपूर या ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत गोंधळा शिवारात २० वर्षांपूर्वी गट नंबर ४६ मध्ये ५६ आर गावठाण जमीन गायरान म्हणून विस्तार करण्यात आला होता. ही जागा भूखंडासाठी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महावितरणकडून महिलेचा सत्कार
हिस्सी : सेलू तालुक्यातील धामणगाव येथील मंगलबाई हिवरकर यांनी महाकृषी योजनेंतर्गत आपल्या कृषीपंपाचे संपूर्ण वीजबिल वीज वितरण कंपनीकडे अदा केले. त्याबद्दल महावितरणचे कार्यकारी अभियंता आरगडे यांनी मंगलाबाई हिवरकर यांचा सत्कार केला. याप्रसंगी चापके, थोरात, सरपंच शारदा महाजन, राहुल बोकन आदी उपस्थित होते.
फरशा उखडल्या; खिडक्याही तुटल्या
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ कोटी ८८ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या बाल रुग्ण विभाग आणि प्रशासकीय इमारतीची दोन वर्षांतच दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या फरशा उखडल्या आहेत, तर काही ठिकाणी खिडक्याही तुटल्या आहेत.
ग्रामीण प्रवाशांची हेळसांड
परभणी : येथील बसस्थानकावर शहरी प्रवाशांसाठी तात्पुरते शेड उभारले आहे. मात्र, ग्रामीण प्रवाशांसाठी आगार प्रमुखांच्यावतीने कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देणे गरजेचे आहे.
विजेअभावी पिके वाळू लागली
परभणी : वीज वितरण कंपनीच्यावतीने थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या वीजबिल वसुली मोहिमेचा मोठा फटका बसला आहे. परिणामी सिंचन खुंटले आहे. ८ मार्च रोजी अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांनाही गैरसोयींचा सामना करावा लागला.