परभणी : मोबाईल ॲपमध्ये असलेल्या अनेक त्रुटी तसेच आऊटडेटेड मोबाईल दिल्याने अंगणवाडी सेविकांनी त्यांचे मोबाईल प्रशासनाला परत केले आहेत. हे मोबाईल परत करुन साधारणत: एक महिन्याचा कालावधी उलटला तरी प्रशासनाने कोणतीच पावले उचलली नसल्याने अंगणवाडी सेविकांना ऑफलाईन कामे करावी लागत असून, त्यांचा ताण दुपटीने वाढला आहे.
अंगणवाडी सेविकांना ऑफलाईन कामाचा ताण पडू नये, या उद्देशाने त्यांना मोबाईल देण्यात आले. सुरुवातीला या मोबाईलमध्ये असलेल्या कॅश नावाच्या ॲपमध्ये व्यवस्थित माहिती भरली जात होती, त्याचे प्रशिक्षणही अंगणवाडी सेविकांना मिळाले होते. मात्र प्रशासनाने या ॲपमध्ये बदल केला आणि अंगणवाडी सेविकांच्या अडचणी वाढल्या. तसेच दिलेले मोबाईल आऊटडेटेड असल्याने ते वारंवार बंद पडतात. त्याचाही खर्च मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईल प्रशासनाला परत केेले आहेत. मात्र प्रशासनाने देखील त्याची दखल अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे सध्या पोषण आहाराचे वाटपाच्या नोंदीसह इतर सर्व कामे ऑफलाईन पद्धतीने करावी लागत आहेत. मॅन्युअली रजिस्टर मेन्टेन करावे लागत असल्याने सेविकांसमोर अहवालाचा ताण वाढला आहे.
कामांचा व्याप
अंगणवाडी सेविकांना वेगवेगळे १६ ते १७ प्रकारचे रजिस्टर मेंटेन करावे लागतात. ही माहिती ऑनलाईन भरताना थोडा त्रास कमी झाला होता. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पर्यायी व्यवस्था झाली नाही. परिणामी ही सर्व माहिती ऑफलाईन पद्धतीने भरताना अंगणवाडी सेविकांना ताण वाढला आहे. मोबाईल परत केले तरी अंणगवाडी सेविकांचे काम सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
म्हणून केला मोबाईल परत
अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल आऊटडेटेड आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद पडले आहेत. या मोबाईलची दुरुस्ती ठराविक दुकानातूनच करावी, असा आग्रह धरला जातो. त्याची बिलेही दिली जात नाहीत.
अंगणवाडी सेविकांना दिलेल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अनेक त्रुटी आहेत. शिवाय या ॲपमध्ये इंग्रजीत माहिती भरावी लागते. मराठीमध्ये माहिती भरण्याची सुविधा या ॲपमध्ये नाही.
अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाईलपैकी निम्म्यापेक्षा अधिक मोबाईल बंद झालेले आहेत. त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होतो.