परभणी : एकात्मिक बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट असल्याने बुधवारी आयटकच्या नेतृत्वाखाली मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले. त्यात जिल्ह्यातील नागरी विभागातील सुमारे दीडशे महिलांनी प्रशासनाला मोबाईल परत केले आहेत.
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी, कर्मचारी युनियनने राज्य सरचिटणीस ॲड. माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. यावेळी कॉ. ज्योती कुलकर्णी, वर्षा चव्हाण, अर्चना कड, सीमा देशमुख, आदींनी महिलांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील दीडशे महिलांनी आपले मोबाईल परत केले आहेत.
अंगणवाडी सेविकांना निकृष्ट दर्जाचे मोबाईल दिले आहेत. त्याची वॉरंटी व गॅरंटी संपलेली आहे. अनेक सेविकांचे मोबाईल नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीचा खर्चही सेविकांनाच करावा लागत आहे. तसेच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये त्रुटी आहेत. या संदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदन दिले; परंतु, या निवेदनांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शासनाचा निषेध नोंदवत एकात्मिक बालविकास विभागाकडे हे मोबाईल जमा करण्यात आले.
अशा आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या
सेविकांना चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावेत. पोषण ट्रॅकर ॲप मराठीतून करावे, या ॲपमधील त्रुटींची सुधारणा करावी; तसेच अंगणवाडी सेविकांना कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.