परभणी: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी दुपारी २ वाजता जुन्या जिल्हा परिषद इमारतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
वारंवार तोंडी व लेखी विनंती करूनही जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे इंधन बिल अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्वरित थकीत इंधन बिल व टीए बिल देण्यात यावे, अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ करावी, जानेवारी फेब्रुवारीचे एसएनएच्या माध्यमातून पतसंस्थेला द्यावयाची कर्ज हप्त्याची रक्कम तत्काळ देण्यात यावी, २०२२-२३ मधील सीबी ६०००, स्टेशनरी २०००, गणवेश १०००, सिम कार्ड रिचार्जाचे दोन हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अदा करावे, यासह आदी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने मंगळवारी दुपारी २ वाजता जिंतूर रस्त्यावरील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.