वाहतुकीस अडथळा
सोनपेठ : शहरातील शासकीय कार्यालयाच्या समोरील मुख्य रस्त्यालगतच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे शिवाजी चौकाकडून येणाऱ्या रहदारीवर परिणाम होत आहे.
रेल्वे पुलाचे काम रखडले
परभणी : येथील अक्षदा मंगल कार्यालयापासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम शहराकडील बाजूने ठप्प झाले आहे. या भागात नुसतेच खोदकाम करण्यात आले आहे. त्यानंतर, काम प्रलंबित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
धुळीमुळे रहिवाशी झाले त्रस्त
परभणी : शहरातील रेल्वे डेपो ते अक्षदा मंगल कार्यालय या दरम्यान कच्चा रस्ता असल्याने व या रस्त्यावरुन रेल्वे डेपोतून अवजड वाहने भरून जात असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याचा या परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. काहींना यामुळे श्वसनाचे आजार होत आहेत, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
उपलब्ध पाण्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले
परभणी : जिल्ह्यात या वर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. पूर्णा, गंगाखेड, पालम, पाथरी या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. गोदावरी पात्रातील बंधारे, जायकवाडी, दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाकडे कल वाढविला आहे. उन्हाळी पिकांनाही याचा लाभ होत आहे.
मास्कची विक्री वाढली
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, मास्कचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तीन दिवसांपासून कारवाया सुरू केल्याने शहरी भागात मास्कची विक्री वाढली आहे. बाजारपेठ भागातील रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी मास्क विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत.
बस स्थानक परिसरात अस्वच्छता वाढली
परभणी : येथील बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. नालीचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतेही उपाय केले नाहीत. त्यामुळे घाण पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.