परभणी- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्याची ऐकीव बातमी आहे; परंतु, या संदर्भात लेखी स्वरुपात काहीही मिळालेले नाही. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात मिळणार नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी परभणी जिल्ह्यात दाखल झाली. यानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, पाठीमागच्या काळात मी राज्य सहकारी बँकेचा संचालक जरुर होतो. त्यावेळी राज्याचा उपमुख्यमंत्री, मंत्री होतो. त्यामुळे संचालक मंडळाच्या काही बैठकांना हजर होतो; परंतु, कमिटीच्या एकाही बैठकीला हजर नव्हतो. संचालक मंडळात जवळपास ५५ विविध राजकीय पक्षांचे संचालक होते. न्याय व्यवस्थेविषयी आपणास नितांत आदर असून न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्याची ऐकीव बातमी आहे. अजून मला या संदर्भात काही वाचण्यास मिळाली नाही. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात मिळणार नाही, तोपर्यंत यावर काहीही भाष्य करणे उचित नाही, असे अजित पवार म्हणाले.
समोरच्या पक्षातील नेते आमच्या कॉन्टॅक्टमध्येआमच्या पक्षातील काही नेते सत्ताधारी पक्षात जात आहेत. जसे आमच्याकडे आऊटगोर्इंग आहे, तसे त्यांच्या पक्षातील नेतेही नवीन येणाऱ्या नेत्यांमुळे अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आम्हालाही तसे निरोप येत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवशी खरे चित्र समोर येईल, असेही ते म्हणाले.