परभणी : महाराष्ट्र शासन आणि महाआयटी या कंपनीकडून परभणी शहरातील मालमत्तांचे जीओ ग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम (जीआयएस) प्रणालीने सर्वेक्षण केले जात आहे़ आतापर्यंत शहरातील सुमारे ३ हजार ८०० घरांच्या बांधकामांचे आॅनलाईन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे़
स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि शहरांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत असलेल्या मालमत्तांचे आॅनलाईन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे़ या सर्वेक्षणासाठी महाआयटी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे़ परभणी शहरात २३ जुलैपासून आॅनलाईन सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, महाआयटी कंपनीचे कर्मचारी घरोघरी फिरून सर्वेक्षण करीत आहेत़ सध्या प्रभाग क्रमांक क मध्ये हे काम सुरू करण्यात आले आहे़
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महाआयटी कंपनीला नागपूर येथून शहराचा आॅनलाईन नकाशा उपलब्ध करून देण्यात आला असून, या नकाशाच्या माध्यमातून प्रत्येक मालमत्तेच्या बांधकामांच्या नोंदी आॅनलाईन घेतल्या जात आहेत़ महाआयटी कंपनीचे कर्मचारी घरोघरी फिरत असून, एकूण मालमत्ता, त्यावर झालेले बांधकाम याच्या नोंदी घेऊन त्या अॅपद्वारे आॅनलाईन टाकल्या जात आहेत़ या सर्वेक्षणामुळे शहरातील प्रत्यक्ष मालमत्तांची संख्या आणि या मालमत्तांवर झालेल्या प्रत्यक्ष बांधकामाचा अंदाज बांधता येणार आहे़ त्यावरून शहराला द्यावयाच्या पायाभूत सुविधांचाही विचार शासनाच्या वतीने केला जाणार आहे़
२३ जुलैपासून शहरात हे काम सुरू करण्यात आले असून, त्यासाठी राहुल वहिवाळ, सचिन भिसे, प्रवीण गायकवाड यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ येत्या दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी १६० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे़ परंतु, सध्या केवळ ७० कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हे सर्व्हेक्षण केले जात आहे़
६८ हजार ५०० मालमत्तापरभणी शहरात एकूण ६८ हजार ५३३ मालमत्ता आहेत़ त्यात प्रभाग क्रमांक अ मध्ये १० वार्ड असून, या वार्डात १९ हजार ५५१, प्रभाग क्रमांक ब मध्ये १४ वार्ड असून, त्यात २४ हजार ११८ आणि ११ वार्डांचा प्रभाग क्रमांक क मध्ये सर्वाधिक २४ हजार ८६२ मालमत्ता आहेत़ या सर्व मालमत्तांचे जीआयएसद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे़
दुसऱ्यांदा शहराचे सर्वेक्षणमहानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक १० वर्षांनी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाते़ या सर्व्हेक्षणात वाढीव मालमत्तांच्या नोंदी घेणे, एकूण मालमत्तांची नोंद घेतली जाते़ परभणी शहरात दोन वर्षापूर्वी या सर्वेक्षणासाठी लातूर येथील एका एजन्सीची नियुक्ती केली होती़ परंतु, ते काम अर्धवट अवस्थेत राहिले़ दोन वर्षापूर्वी महापालिकेकडे केवळ ४५ हजार मालमत्तांचीच नोंद होती़ त्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांनीच मालमत्तांचे सर्वेक्षण केले तेव्हा या मालमत्ता ६५ हजारांपर्यंत पोहोचल्या़ महापालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते़ वाढीव मालमत्तांच्या नोंदी झाल्याने महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली़ आता शासनाच्या वतीनेच मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याने महानगरपालिकेलाही या सर्वेक्षणाचा लाभ होणार आहे़
स्मार्ट डिस्टोमीटरच्या सहाय्याने नोंदीपरभणी शहरात मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या कर्मचाऱ्यांना स्मार्ट डिस्टोमीटर हे मशीन दिले असून, या मशीनच्या सहाय्याने झालेल्या बांधकामाचे मोजमाप केले जात आहे़ मोजमाप घेतल्यानंतर मोबाईल अॅपच्या लिंकमध्ये मॅपद्वारे लोकेशन घेऊन या नोंदी जागेवरच फिड केल्या जात आहेत़ त्यामुळे शहराच्या मालमत्तांच्या बांधकामाचा डाटा आॅनलाईन उपलब्ध होणार आहे़ मालमत्ताधारकांनी महाआयटी कंपनीचे आयकार्ड असलेल्या कर्मचाऱ्यांना घरपट्टी, आधारकार्ड दाखवून मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे़
राज्य, केंद्रांच्या योजनांचा होणार लाभशहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण झाल्यानंतर शहरामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत़ मालमत्तांच्या नोंदीनुसार या योजनांमधील निधीची तरतूद करणे सोयीचे होणार असल्याने शासनाने हा प्रकल्प हाती घेतला आहे़
घरपट्टीही आॅनलाईनहे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर परभणी शहरातील मालमत्ताधारकांना घरपट्टी देखील आॅनलाईन दिली जाणार आहे़