परभणी : पैशासाठी लहान मुलांचे अपहरण करून विकणारी आंतरराज्य टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली. या टोळीकडून आणखी एका मुलाची तेलंगणा राज्यातील संगारेड्डी येथून सुटका करण्यात पोलिस दलाला यश आले आहे. या अपहृत मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गुरुवारी ऑपरेशन मुस्कानअंतर्गत आतापर्यंतच्या चौथ्या मुलाची सुटका करण्यात आली आहे. यापूर्वी पालम येथील एक तर कोतवाली हद्दीतील दोन मुलांची सुटका करण्यात आली होती. आता कोतवाली हद्दीतील तिसऱ्या बालकाला शोधून आणण्यात पोलिसांना यश आले आहे. साखला प्लॉट भागातील पाच वर्षीय बालकाचे ५ मार्च २०२२ रोजी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद झाला होता. या अपहृत मुलाला १२ मार्चला तेलंगणा राज्यातील संगारेड्डी येथून परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेतील एकूण आरोपींची संख्या आता १६ झाली आहे. पूर्वी ताब्यात घेतलेल्या आरोपींना २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
यांनी केली कारवाईपोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मारुती चव्हाण, साईनाथ पूयड, नागनाथ तुकडे, व्यंकट कुसुमे, पोलिस उपनिरीक्षक राधिका भावसार यांच्या पथकातील दिलावर खान, आशा सावंत, मधुकर ढवळे, निकाळजे, खूपसे, मोबीन, तूपसुंदरे, जाधव, सातपुते, जयश्री आव्हाड, गायकवाड, परसोडे, रफीयोद्दिन, दुबे, चाटे यांनी हा तपास पूर्ण केला.
दोन बालकांचा लागला शोधऑपरेशन मुस्कानअंतर्गत एक पाच वर्षीय व एक तीन वर्षीय बालकाचा विजयवाडा येथून पोलिस दलाला शोध लागला आहे. ही दोन्ही बालके परजिल्ह्यातील असून त्यांना व त्यांच्या पालकांना शोधण्यासाठी पोलिस दलाकडून पुढील प्रक्रिया सुरू आहे.