परभणी : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने १८ जागांपैकी १३ जागी विजय संपादन करून स्पष्ट बहुमत मिळवले. तर भारतीय जनता पक्षाने ४ तर अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळविला. असे असले तरी व्यापारी मतदार संघात एका जागेवर अपक्षाने बाजी मारल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयात अण्णासाहेब गव्हाणे सभागृहात शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. सकाळी १० वाजेच्या सुमारास पहिला निकाल हाती आला. दुपारी दोन वाजता निकालाचा स्पष्ट झाला. या निकालात सहकारी संस्था मतदारसंघात गणेश रामभाऊ घाटगे,पंढरीनाथ शंकरराव घुले, अजय माधवराव चव्हाण,संग्राम प्रतापराव जामकर, अरविंद रंगराव देशमुख या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय पटकाविला. तर याच मतदारसंघात भाजपाचे आनंद शेषराव भरोसे, विलास साहेबराव बाबर हे विजयी झाले. तसेच महिला मतदारसंघात काशिबाई रुस्तुमराव रेंगे, शोभा मुंजाजीराव जवंजाळ या महाविकास आघाडीच्या दोन्ही महिला विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय मतदारसंघात गंगाप्रसाद आबासाहेब आनेराव हे विजयी झाले. विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये सुरेश रामराव भुमरे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले.
ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसधारण गटात पांडुरंग बालासाहेब खिल्लारे, विनोद सखारामजी लोहगावकर हे दोघे आघाडीचे उमेदवार विजयी झाले. अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघात घनशाम गणपतराव कनके हे विजयी झाले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात राजाभाऊ बालासाहेब देशमुख हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर व्यापारी मतदारसंघात रमेश भिमराव देशमुख हे अपक्ष उमेदवार विजयी झाले. तर सोपान वसंतराव मोरे या महाविकास आघाडीचे उमेदवाराने बाजी मारली. हमाल व तोलारी मतदारसंघातून पठाण फैजूल्ला खान अहमद खान हे आघाडीचे उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव यादव यांनी ही माहिती दिली.