शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक
परभणी : कृषी सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने शेतमालाच्या खरेदी-विक्रीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यावर विचारविनिमय करण्यासाठी शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांच्या उपस्थितीत २५ जानेवारी सकाळी १० वाजता औरंगाबाद येथील गांधी भवनमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन अमृतराव शिंदे, बंडू सोळंके, माउली कदम यांनी केले आहे.
सावता परिषदेची बैठक
परभणी : येथील सावता परिषदेच्या वतीने २४ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता कल्याणराव आखाडे यांच्या उपस्थितीत शहरातील सावली विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस जिल्ह्याच्या सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे, संगीताताई सत्वधर, प्रभुदेवा जाधव यांनी केले आहे.
आरोपीस फाशीची देण्याची मागणी
परभणी : नांदेड जिल्ह्यातील दिवशी बु. येथे पाचवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत २१ दिवसांच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी परभणी तालुक्यातील नांदखेडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर संतोष पुरणवाड, योगेश आदमे, विष्णू नांदखेडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करा
परभणी : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या अगोदर संविधानामधील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात यावे, अशी मागणी द मेट्टा फाउण्डेशनच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनावर बाळासाहेब जाधव, राहुल ढेरे, गौरवकुमार तारू, रत्नदीप वावळे, ॲड. प्रीतिश भराडे, सिद्धांत खंदारे, आकाश कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्हा मासिक चर्चासत्रास प्रतिसाद
परभणी : गंगाखेड तालुक्यात २० जानेवारी रोजी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिकांवरील कीड, रोग, रब्बी पीक लागवडीची प्रत्यक्ष शेतावरील पाहणी करण्यासाठी जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्षेत्र भेटीअंतर्गत धारखेड, खोकलेवाडी, डोंगर पिंपळा, खंडाळी, मरडसगाव येथे भेट देऊन टरबूज, पपई, सीताफळ, सामूहिक शेततळे आदींची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. यू.एन. आळसे, सागर खटकाळे, के.आर. सराफ आदींची उपस्थिती होती.