परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक मंडळाच्या निवडीसाठी १५ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या या बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक नाडी म्हणून बँकेकडे पाहिले जाते. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
१५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीपर्यंत येथील जिल्हा बँकेच्या शेतकरी भवनात नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. २३ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, २४ फेब्रुवारी रोजी वैध नामनिर्देशनपत्रांची यादी जाहीर होणार आहे. २१ मार्च रोजी मतदान होणार असून, २३ मार्च रोजी मतमोजणीअंती निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत एकूण १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी बालासाहेब रामराव देसाई, आ.तानाजी सखारामजी मुरकुटे, अरुण लक्ष्मणराव गुंडाळे, अब्दुल्ला खाँ लतिफखाँ दुर्राणी, दत्तात्रय रामभाऊ मायंदळे यांचे ७ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आणखी पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.