पाथरी : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी होत असून, निवडणुकीसाठी ५९३ कर्मचाऱ्यांना अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १४ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २८ सहायक यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढल्याने तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतच्या सरपंचांची मुदत संपल्यानंतर या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. जुलै ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने निवडणूक विभागाने ग्रामपंचायतीचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
४२ ग्रामपंचायतींसाठी १४ निवडणूक निर्णय अधिकारी तसेच त्यांना प्रत्येकी २ सहायक याप्रमाणे २८ कर्मचारी मिळून ४२ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांची १८ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाची माहिती देण्यात आली.
तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींसाठी १३५ मतदान केंद्र असून, प्रत्येक केंद्रावर ४ कर्मचारी प्रमाणे ५४० कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेसाठी अलर्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर अतिरिक्त ७० कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याने निवडणूक विभागाने एकूण ५९३ कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त केली आहे.
बॉक्स
राखीव जागेतून ग्रामपंचायतची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जात पडताळणी प्रस्ताव १५ ए वर संबंधित ग्रामपंचायतसाठी नेमण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात हालचाली वाढल्या
कोविड १९ च्या काळात रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आता ग्रामीण भागात निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुका गट तट यावर बऱ्यापैकी अवलंबून असल्याने चुरस पहावयास मिळणार असल्याचे दिसत आहे.
३७० सदस्य निवडले जाणार
४२ ग्रामपंचायतमधून ३७० सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी ६७ हजार ५०० मतदार असून यात महिला मतदार ३२ हजार १९८ तर पुरुष मतदार ३५ हजार ३०० आहेत. २ मतदार तृतीयपंथी आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार ए. एन. नवघिरे यांनी दिली.