परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी छत्रपती संभाजी नगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. शिवाजी सुक्रे यांची नियुक्ती केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने मंगळवारी सहसचिव शिवाजी पाटणकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निघाले आहेत.
परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज हाताळण्यासाठी अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा.डॉ. संजय मोरे यांच्याकडे १६ जुलै २०२२ च्या पत्रान्वये सोपविण्यात आला होता. डॉ.संजय मोरे यांनी वैयक्तिक कारणास्तव अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शरीररचनाशास्त्र विभागातील प्रा.डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे प्राध्यापक पदाची कर्तव्ये, जबाबदारी सांभाळून परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत सोपीविण्यात आला आहे.
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखप्रा.डॉ.शिवाजी सुक्रे यांच्याकडे नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातील काही तांत्रिक बाबीचे प्रकरण सोपविण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी केवळ दोन महिन्यांमध्ये येथील प्रश्न सोडविला होता. त्यामुळे नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अनुभव आणि कडक, शिस्तप्रिय भूमिका असलेले डॉ.शिवाजी सुक्रे यांच्याकडे परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी त्यांचा कामाचा अनुभव उपयोगी येणार आहे.