पालम (परभणी ) : तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत छाननी समितीने अखेर ३८० सिंचन विहिरींना मंजुरी दिली आहे. ‘लोकमत’ने वेळीवेळी या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता. उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे यांनी पुढाकार घेत तालुकास्तरीय यंत्रणा कामाला लावत शेतकºयांचा प्रश्न मार्गी लावला आहे.
गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार बदल असल्याने पालम तालुक्यात मागील तीन महिन्यात रोजगार हमी योजनेतील कामे ठप्प पडली होती. विविध योजनांच्या प्रस्तावांचे ढीग साचले होते. अनेक वेळा छाननी समितीच्या बैठका रद्द झाल्याने अधिकारी व कर्मचारी गंगाखेडहून रिकाम्या हाताने परत येत होते. पंचायत समितीमधील कामावर नेहमीच पदाधिकारी व अधिकाºयात वाद होत होते.
अखेर ९ मार्च रोजी झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार तेजस्विनी जाधव, गटविकास अधिकारी महादेव कोळी, एपीओ गिरीश शिंदे, रोहयो विभाग प्रमुख पांचाळ यांनी प्रस्ताव मार्गी लावले. यामध्ये ३८० सिंचन विहीर, ७४ विहीर पुनर्भरण, २५ अंतर्गत रस्ते, २७ शौचालय, ३० शेततळे या कामांना मंजुरी दिली आहे. प्रशासकीय मान्यतेसाठी हे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आदेश मिळताच कामे सुरू करण्यात येणार आहेत.
प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीपंचायत समितीकडे प्राप्त झालेले प्रस्ताव छाननी समितीपुढे ठेऊन मंजुरी घेण्यात येत आहे. पंचायत समितीस्तरावर एकही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही. प्राप्त प्रस्ताव तातडीने छाननी समितीकडे सादर करण्यात येतील.- महादेव कोळी,गटविकास अधिकारी पालम