लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ४ जानेवारीपासून सुरू झालेल्या भारतीय सैन्य भरतीच्या निमित्ताने दररोज हजारो विद्यार्थी परभणी शहरात दाखल होत असून, यानिमित्ताने शहरातील लघु व्यावसायिकांची उलाढाल दुपटीने वाढली आहे़ काही व्यावसायिकांनी थेट विद्यापीठ परिसरातच हातगाडे लावून नाश्ता व इतर व्यवसाय सुरू केले आहेत़ या सर्व व्यावसायिकांच्या माध्यमातून दररोज लाखांच्या घरात उलाढाल होत आहे़भारतीय सैन्य दलातील ३ ट्रेडसाठी ४ जानेवारीपासून परभणीत सैन्य भरतीला प्रारंभ झाला आहे़ परभणी जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी परभणीत दाखल होत आहेत़ सैन्य भरती ही रात्री उशिरा सुरू होत असून, पहाटेपर्यंत चालते़ त्यामुळे बहुतांश उमेदवारांना परभणी शहरात मुक्कामी यावे लागत आहे़ निवास, भोजन तसेच दिवसभरातील चहापाणी आणि नाश्त्याच्या निमित्ताने शहरातील आर्थिक उलाढालीमध्ये भर पडली आहे़ एकाचवेळी हजारोंच्या संख्येने उमेदवार परभणीत दाखल होत असून, ही संधी साधत अनेक व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात काहीसा बदल करून व्यवसाय सुरू केला आहे़ त्यासाठी साहित्यांचा साठाही वाढविला आहे़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया होत आहे़ त्यामुळे याच ठिकाणी अधिक संख्येने लघु व्यावसायिकांनी हातगाडे थाटले आहेत़ विद्यापीठाच्या परिसरामध्ये सुमारे ४० ते ५० हजार हातगाड्यांवर खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्यांची विक्री होत आहे़ तसेच उमेदवारांच्या गरजेनुसार या भागात झेरॉक्स दुकानेही सुरू केली आहेत़ ९ जिल्ह्यातून भरती प्रक्रियेसाठी उमेदवार परभणीत दाखल होत आहेत़ रात्रभर भरती प्रक्रिया राबविली जात असल्याने लघु व्यावसायिकांनीही चहा, नाश्त्याचा व्यवसाय रात्रभर सुरू ठेवला आहे़ तसेच दिवसाही या व्यवसायामध्ये उलाढाल वाढली आहे़ कृषी विद्यापीठाच्या परिसरात मध्यरात्री २ वाजेपर्यंत हे व्यवसाय चालतात़ वाढलेली थंडी लक्षात घेता या भागात चहाचीही जोरात विक्री होत आहे़ याशिवाय केळी विक्री करणारे विक्रेते, अंडा आम्लेट, नाश्त्यासाठी पोहे, पुरी भाजी, समोसे, वडापाव इ. खाद्य पदार्थ विक्री केले जात आहेत़ साधारणत: ४० ते ५० लघु व्यावसायिक या भागात आहेत़ या व्यावसायिकांचा दिवसाकाठी सरासरी २ हजार रुपयांचा व्यवसाय गृहित धरला तरी विद्यापीठाच्या परिसरात दररोज ८० हजारांची उलाढाल होत आहे़सैन्य भरतीच्या निमित्ताने४खाद्य पदार्थांबरोबरच झेरॉक्स दुकानेही सध्या तेजीत आहेत़ बाहेरगावाहून येणारे उमेदवार शक्यतो रेल्वे गाडीने परभणीत दाखल होत आहेत़ त्यामुळे रेल्वेस्थानकापासून ते कृषी विद्यापीठापर्यंत तसेच वसमत रोड ते काळी कमानपर्यंत असणाºया व्यवसायांनाही तेजी आली आहे़ विशेषत: झेरॉक्स, स्टेशनरी साहित्याची खरेदी वाढली आहे़ या व्यवसायातही दुप्पट वाढ झाली असून, दिवसाकाठी साधारणत: ८० हजारांची उलाढाल या व्यवसायाच्या माध्यमातूनही होत आहे़ एकंदर सैन्य भरतीच्या निमित्ताने परभणी शहरातील लघु व्यवसायात तेजी आल्याचे दिसत आहे़काहींनी घेतला गर्दीचा फायदा४देश सेवेचे स्वप्न घेऊन सैन्य भरतीत दाखल होण्यासाठी परभणी शहरात युवक येत आहेत़ काही सेवाभावी नागरिकांनी या युवकांसाठी मोफत नाश्ता, चहा आणि निवासाची व्यवस्था केली आहे़; परंतु, दुसरीकडे काही लघु व्यावसायिकांनी मात्र गर्दीचा फायदा घेत भाव वाढविले आहेत़४अडलेल्या या युवकांना त्यामुळे अधिकचे पैसे मोजून या वस्तू, खाद्य पदार्थ खरेदी करावे लागत आहेत़ सर्वसाधारणपणे बाजारात २ रुपयांना एक झेरॉक्स मिळत असताना काही जण मात्र एका झेरॉक्ससाठी ५ रुपये घेत आहेत़ तर नोटरी करण्यासाठी साधारणत: १०० ते १५० रुपयांचा खर्च येतो़४त्यासाठी ५०० रुपये आकारले जात आहेत़ पाण्याची बाटली १५ रुपयांना मिळत असताना रात्रीच्या वेळी २० रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारीही ऐकावयास मिळाल्या़प्रत्येक रस्त्यावर युवकांचे लोंढेशनिवारपासून परभणी शहराच्या वातावरणातच बदल झाला आहे़ शहरातील रस्ते युवकांनी फुल्ल झाल्याचे दिसत आहे़ स्टेशन रोड ते कृषी विद्यापीठाच्या गेटपर्यंतचा रस्ता तर कायमस्वरुपी युवकांचे लोंढे घेऊन वाहत आहे़ त्याचबरोबर शहरात अनेक भागामध्ये सैन्य भरतीसाठी दाखल होणाºया युवकासांठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे़ त्यामुळे शहरातील इतर रस्त्यांवरही युवकांची गर्दी पहावयास मिळत आहे़ रात्रीच्या वेळी तर कृषी विद्यापीठाचा परिसर रात्रभर फुलेला दिसत असून, या भागातील मोकळ्या मैदानांवर आराम करणाºया युवकांचे जथ्थे पहावयास मिळत आहेत़दररोज ७ हजार युवक भरतीसाठीसैन्य भरतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातून दररोज सुमारे ७ हजार युवक रेल्वे गाड्यांनी परभणी शहरात दाखल होत आहेत़ दिवसभर परभणीकडे येणाºया रेल्वे गाड्या फुल्ल होऊन येत आहेत़ यामध्ये सरासरी ६ ते ७ हजार युवक शहरात येत आहेत़परभणी शहरातून परत जाणाºया प्रवाशांची संख्याही १० टक्क्यांनी वाढल्याची माहिती रेल्वे विभागातून मिळाली़ परभणी रेल्वेस्थानकावरून दररोज १५ हजार प्रवासी प्रवास करतात़ त्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे़ त्याचप्रमाणे परभणी रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे ६ लाख रुपयांची तिकीटे काढली जातात़४ जानेवारीपासून त्यातही ५० हजार रुपयांची वाढ झाली असून, सरासरी साडेसहा लाख रुपयांची तिकीट या स्थानकावरून काढली जात असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे़भारतीय सैन्य भरतीच्या निमित्ताने कृषी विद्यापीठात दररोज हजारो विद्यार्थी दाखल होत आहेत़ त्यामुळे आमच्या व्यवसायात दुपटीने वाढ झाली आहे़ मात्र व्यवसाय करतानाही तो रात्री उशिरापर्यंत करावा लागत आहे़ त्यामुळे कष्टही त्याचप्रमाणात घ्यावे लागत आहेत. रात्री २ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवले जात आहे़-रामभाऊ निर्वळ,हॉटेल व्यावसायिक
परभणीत सैन्य भरती सुरू : लघु व्यवसायांची उलाढाल दुपटीने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:36 AM