पोलीस बंदोबस्तात २ सहाय्यक पोलीस अधीक्षक, १९ पोलीस निरीक्षक, ३६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५५ पोलीस उपनिरीक्षक, ९७३ महिला व पुरुष पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यासह ४९१ पुरुष होमगार्ड व ६१ महिला होमगार्ड तसेच साध्या वेशातील पोलीस कर्मचारी व कॅमेरामॅन पोलीस असे ३१ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. बंदोबस्तासाठी १ पोलीस उपअधीक्षक व १० प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जलद कृती दल, आरसीपी प्लाटून तैनात
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अतिरिक्त बंदोबस्त बाहेरील जिल्ह्यातून मागविण्यात आला आहे. यामध्ये २ जलद कृती दलाच्या तुकड्या व आरसीपीचे ४ प्लाटून व पुणे येथून आलेले एसआरपीचे जवान आवश्यक त्या जागी तैनात केले जाणार आहेत.
विसर्जन मिरवणुकांना बंदी
शासनाच्या आदेशाप्रमाणे गणेश विसर्जन मिरवणुका यंदा काढण्यात येणार नाहीत. तसेच जिल्ह्यात मूर्ती संकलन स्थानिक प्रशासनाकडून एकत्रितरित्या करून त्याचे विसर्जन केले जाणार आहे. शहरात विसर्जनाच्या दिवशी संशयित व बेवारस वस्तू तसेच वाहन आढळून आल्यास याबाबतची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यास व नियंत्रण कक्षास कळवावी, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.